पंढरपूर – आषाढ शु. अष्टमीला तोंडले येथून सोहळा निघाल्यावर वाटेत सोपानकाकांच्या पालखीची व माउलींच्या पालखीची बंधू भेट माळशि-रस तालुक्याच्या हद्दीत झाली. दुपारच्या भोजनानंतर टप्पा येथे माउलींचा पालखी सोहळा विसावतो. याच वेळी सोपानकाकाकांचा पालखी सोहळा शेजारून पुढे जातो. सोपानकाकांचा रथ माउलींच्या रथा शेजारी आल्यावर थोडा वेळ थांबतो. यावेळी दोन्ही संस्थानकडून परस्परांना नारळ प्रसाद दिला जातो. तत्पूर्वी संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचे ठाकूर बुवा समाधी येथे नेत्रदीपक गोल रिंगण संपन्न झाले.माउलीच्या पालखीचे वेळापूर येथून प्रस्थान झाल्यानंतर ठाकूर बुवा समाधी या ठिकाणी पालखी पोहोचली. या ठिकाणी संत ज्ञानेश्वर महाराज पालखीचा माउली माउली जयघोष आणि टाळ मृदंगाचा निनाद करीत रिंगण सोहळा पार पडला. त्यानंतर पालखी पुढे मार्गस्थ झाली. काही वेळातच मा-ळशिरस तालुक्याच्या हद्दीत जेष्ठ बंधू सोपानदेव महाराज व संत ज्ञानेश्वर महाराज पालखीची भेट झाली. या दोन पालख्या एकमेकांना भेटल्या. या वेळी उपस्थित भाविकांनी विठ्ठल विठ्ठलचा जयघोष केला. माउलीच्या पालखी विश्वस्तांनी सोपानदेव यांच्या मानकऱ्यांना मानाचा नारळ प्रसाद दिला. बंधू भेटीचा भावपूर्ण सोहळा पाहून भाविक सुखावले. पुढे माउलीची पालखी भंडीशेगाव येथे मुक्कामी पोहचली. जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांची पालखी बोरगाव येथून मार्गस्थ होत तोंडले बोंडले या ठिकाणी पोहोचली. या ठिकाणी पालखीतील सर्व भाविक धावले. तुका म्हणे धावा… आहे पंढरीस विसावा या अभंगाप्रमाणे भाविकांनी धावा केला आणि पालखी पिराची कुरोली येथे मुक्कमी पोहोचली. यावेळी संत ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम महाराजांच्या पालख्यांचे पंढपूर तालुक्यात आगमन झाले. या पालख्यांचे पंढरपूर तालुका प्रशासनाच्या वतीने तहसीलदार सचिन लंगुटे, गटविकास अधिकारी सुशील संसारे यांनी स्वागत केले.
