पंढरपूर – चंद्रभागा स्नान, नगर प्रदक्षिणा करत लाखो भाविकांच्या हरिनामाच्या जयघोषाने अवघी पंढरीनगरी दुमदुमली आहे. आषाढी एकादशीच्या मुख्य सोहळ्याला लाखो भाविकांनी उपस्थिती दर्शवत एकादशी सोहळा साजरा झाला. दर्शन रांग गोपाळपूरच्या पुढे गेली असून दर्शनासाठी १४ ते १५ तासांचा वेळ लागत आहे. यामुळे पंढरीनगरी वैष्णवमय झाली आहे. मठ, मंदिर, संस्थाने, ६५ एकर येथील भक्तिसागरातील तंबू, राहुट्यांमधून भजन, कीर्तन व प्रवचनात भाविक दंग आहेत. पंढरीत भाविकांची मांदियाळी दिसून येत आहे. मानाच्या पालख्यांसह विविध संतांच्या पालख्यांबरोबर लाखोंच्या संख्येने भाविक आषाढी एकादशीच्या मुख्य सोहळ्याला पंढरीत आले आहेत. भाविकांमुळे मठ, मंदिरे, धार्मिक शाळा, संस्थाने गजबजून गेली आहेत. ६५ एकर येथील भक्तिसागर, रेल्वे मैदान, उपनगरीय भागातही भाविक राहुट्या, तंबू उभारून वास्तव्य करत आहेत. भजन, कीर्तन, प्रवचनात महाराज मंडळी, तर ऐकण्यात भाविक दंग झाल्याचे चित्र दिसून येत आहे.या वर्षी सुरुवातीला पाऊस चांगला झाल्याने पंढरपूर येथे भाविकांची प्रचंड गर्दी आहे. असंख्य भाविकांनी चंद्रभागा नदीत स्नानानंतर मुखदर्शन व कळस दर्शन घेण्यासाठी तोबा गर्दी केली होती. तितकीच गर्दी रांगेत उभारून पदस्पर्श दर्शनासाठी झाली आहे. मंदिर समितीतर्फे उभारलेल्या दर्शन रांगेत एकादशी दिवशी सुमारे पाच लाख भाविक प्रतीक्षा करत होते. दर्शन रांग पत्राशेडच्या बाहेर पडून गोपाळपूरमध्ये दाखल झाली आहे. येथून पुढे रांझणी रोडवर गेली आहे. भाविकांना दर्शन मिळण्यास सुमारे १२ ते १४ तासांचा अवधी लागत असल्याचे मंदिर समितीकडून सांगण्यात येत आहे.
विठुरायाचा रथ…
आषाढी एकादशीनिमित्त श्री विठुरायाचा रथ काढला जातो. या रथावर खारीक व खोबरे उधळले जाते. असंख्य भाविकांना थेटपणे विठुरायाचे दर्शन होत नाही. त्यांना दर्शन देण्यासाठी प्रत्यक्ष देवच रथयात्रेच्या माध्यमातून प्रदक्षिणा मार्गावर दर्शन देतात, अशी भाविकांची धारणा असते. या रथालाही भाविकांनी प्रचंड गर्दी केली होती.
५२०० एसटी बसेस भाविकांच्या सेवेत
आषाढी यात्रेसाठी यंदा विशेष रेल्वेगाड्या पंढरपूरपर्यंत सोडण्यात आल्या आहेत. सुमारे ५२०० एसटी बसेस भाविकांच्या सेवेकरिता धावत आहेत. महिला व ज्येष्ठ नागरिकांना विशेष सवलत योजना असल्यामुळे महिला भाविकांची संख्या जास्त दिसून येत आहे. शहराबाहेर तात्पुरती चार बसस्थानके तयार केली असून, त्या त्या विभागाकडे बसेस मार्गस्थ करण्यात येत आहेत.
चोऱ्या रोखण्यासाठी दामिनी पथक..
आषाढी यात्रेत चोऱ्या रोखण्यासाठी दामिनी पथक तैनात होते. त्याचबरोबर मुख्यमंत्री महापूजेला आल्याने विशेष सुरक्षा व्यवस्था केली होती. सुमारे ८११७अधिकारी व पोलिस कर्मचारी तैनात केले आहेत.
सात ठिकाणी आपत्कालीन विभाग कार्यरत ठेवला होता. भाविकांना काही अडचण आल्यास त्वरित संपर्क करता येत आहे. आरोग्य कर्मचारी, आरोग्य पथके तैनात असल्याने वेळीच भाविकांना औषधोपचार करण्यात येत आहेत.
