पंढरपूर – यंदाची आषाढी वारी विक्रमी होती, याचा पुरावा आता थेट यावर्षी वापरलेल्या एआय तंत्रज्ञानाने दिला आहे. आषाढी एकादशी दिवशी सकाळी ६ ते रात्री १२ या कालावधीत तब्बल २७ ते २८ लाख भाविकांचा हेड काउंट नोंद झाल्याची माहिती पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी दिली. यावर्षी आषाढी एकादशीला मुंगीलाही पाय ठेवायला जागा नव्हती. जिकडे पाहावे, तिकडे फक्त भाविकांचा महासागर लोटल्याचे चित्र होते. आजवरचे आषाढी वारीच्या गर्दीचे सर्व विक्रम मोडले आहेत.
यंदा पहिल्यांदाच वापरलेल्या एआय तंत्रज्ञानाच्या माध्यमातून सोडण्यात आलेल्या ड्रोनने या भाविकांची मोजणी केली आणि हा आकडा २७ ते २८ लाख इतका मिळून आला. प्रशासनाने एकाच वेळेला चंद्रभागेकडे येणारा मार्ग दर्शन रांग मंदिर परिसर अशा ६ विभागात डोन सोडून ही माहिती संकलित केली आ-हे. आषाढीसाठी ५० हजारांपेक्षा जास्त ट्रक, टेम्पो, कार आणि विविध खाजगी वाहने नोंद झाली आहेत. याशिवाय जवळपास ६ हजार एसटी बसेस आणि १०० रेल्वे फेऱ्यातून प्रवासी आले होते. विशेष म्हणजे द्वादशीला सकाळच्या ६ तासात ९५ टक्के वाहने आणि भाविक परतल्याने आता पंढरपूर मोकळे झाले आहे. वाहतूक नियोजनासाठी आज पहाटेपासून शहराबाहेर पडणाऱ्या सर्व ६ मार्गांवर ६ डीवायएसपी दर्जाचे अधिकारी आणि पोलिसांचा फौजफाटा तैनात होता. त्यामुळे लाखो भाविकांना दुपारपर्यंत बाहेर जाताना कोठेही वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागले नाही. यालाही एआय तंत्रज्ञानाची मदत उपयोगी पडल्याने योग्य नियोजन झाल्याचे पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी सांगितले.आषाढी यात्रेसाठी पंढरीत दरवर्षी लाखो भाविक पंढरीत येतात. पालखी सोहळ्यात वारकऱ्यांच्या मोठ्या प्रमाणात सहभाग असतो.
सुखरूप पार पडली यात्रा
आषाढी एकादशीला यंदा भाविकांची प्रचंड गर्दी होती. गर्दीचा अंदाज घेऊन वाहतुकीचे नियोजन केले होते. यात एकेरी वाहतूक केल्याने मंदिर परिसर प्रदक्षिणामार्ग आणि वाळवंट यापैकी कोठेही चेंगराचेंगरीच्या घटना घडल्या नाहीत. संपूर्ण यात्रा कालावधीत कोणतीही दुर्घटना झाली नसल्याचे त्यांनी सांगितले.
