पंढरपूर – आषाढी यात्रा सोहळा होऊन दोन दिवस उलटले तरी विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनासाठी अजूनही तब्बल आठ ते नऊ तासांचा कालावधी लागत आहे. दर्शन रांग अकरा नंबर पत्राशेडपर्यंत असून, मुख दर्शन मात्र खुले झाले आहे. काही मिनिटांत मुख दर्शन होत असल्यामुळे काही भाविक मुख दर्शनाला पसंती देत आहेत.आषाढी एकादशीला व दशमीला विठ्ठल-रुक्मिणी दर्शन रांग सर्व पत्राशेड भरून ५ किमीपेक्षा जास्त लांब गोपाळपूरच्या पुढे रांझणी रस्त्यापर्यंत गेली होती. त्यामुळे दर्शनासाठी तब्बल १४ ते १५ तास लागत होते. दोन दिवसांनंतर परिस्थिती हळूहळू बदलत असून, आता गर्दी ११ नंबर पत्रा शेडपर्यंत आली आहे. दर्शनासाठी आता ८ ते ९ तासांचा कालावधी लागत आहे. १० ते १५ तास रांगेत थांबूनही काही भाविक पदस्पर्श दर्शनाला पसंती देत आहेत. मुखदर्शन पूर्ण खुले असून ज्यांना दर्शनरांगेत थांबणे शक्य नाही असे भाविक मुख दर्शन घेऊन परतीच्या मार्गावर निघत आहेत.
उद्या गोपाळकाला..
आषाढी यात्रा सोहळा पार पडल्यानंतर गुरुवारी, १० जुलैला गुरुपौर्णिमेच्या दिवशी गोपाळपूर येथील श्रीकृष्ण मंदिरात गोपाळकाला साजरा होणार आहे. त्यासाठी सर्व संतांच्या पालख्या गोपाळपुरात एकत्र येणार असून, वारकऱ्यांना आता गोपाळकाल्याचे वेध लागले आहेत. त्यानंतर आषाढीची सांगता होणार आहे.
