Kapil Sharma Cafe Firing | भारताचा लोकप्रिय कॉमेडियन कपिल शर्मा सध्या धक्क्यात आहे. त्याच्या कॅनडामधील नव्याने सुरू केलेल्या ‘Kap’s Cafe’ वर गोळीबार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या हल्ल्याची जबाबदारी खलिस्तानी दहशतवादी संघटना बब्बर खालसा इंटरनॅशनलने स्वीकारली आहे. या संघटनेशी संबंधित हरजीत सिंग उर्फ लाड्डी या दहशतवाद्याने हा कट रचल्याचा आरोप आहे. (Kapil Sharma Cafe Firing)
10 ते 12 गोळ्यांचा मारा, हल्ल्याचा व्हिडीओ व्हायरल :
कपिल शर्माने काही दिवसांपूर्वीच पत्नी गिन्नी चतरथसोबत कॅनडात कॅफे सुरु केलं होतं. याच ठिकाणी 10 ते 12 गोळ्यांचा मारा करण्यात आला आहे. हा हल्ला इतका गंभीर होता की परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं. घटनेनंतरचा सीसीटीव्ही फुटेजही सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.
हल्ल्याची जबाबदारी स्वीकारणारा हरजीत सिंग लाड्डी हा NIA (राष्ट्रीय तपास यंत्रणा) च्या मोस्ट वाँटेड दहशतवाद्यांपैकी एक आहे. तो मूळचा पंजाबच्या नवांशहर जिल्ह्यातील गरपधाना गावचा असून, सध्या तो जर्मनीत राहतो. लाड्डीवर यापूर्वी अनेक दहशतवादी कारवायांचे आरोप आहेत. एप्रिल 2024 मध्ये, VHP नेते विकास प्रभाकर यांच्या हत्येप्रकरणी त्याच्यावर 10 लाख रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले होते.
हरजीत सिंगचा पाकिस्तानच्या ISI (Inter-Services Intelligence) या गुप्तचर संस्थेशी थेट संबंध असल्याची माहिती उघड झाली आहे. तो बब्बर खालसा संघटनेच्या जागतिक फंडिंग आणि कारवाया पाहतो. कॅनडा, अमेरिका, युरोपमध्ये घडणाऱ्या घटनांचा सूत्रधार हरजीत सिंग असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.
Kapil Sharma Cafe Firing | कायदेशीर कारवाई आणि सुरक्षा वाढवली :
बब्बर खालसा इंटरनॅशनल ही संघटना 1978 मध्ये स्थापन झाली असून, खलिस्तानची मागणी करणाऱ्या आंदोलनात तिचा सहभाग आहे. 1980-90 च्या दशकात अनेक दहशतवादी हल्ले या संघटनेने घडवले. भारतासह अमेरिका, कॅनडा, ब्रिटन आणि युरोपियन युनियनने या संघटनेला ‘दहशतवादी संघटना’ म्हणून घोषित केलं आहे. या संघटनेचा प्रमुख पाकिस्तानात राहत असून, तेथूनच तो कारवाया चालवतो. (Kapil Sharma Cafe Firing)
कॅफेवर झालेल्या हल्ल्याप्रकरणी स्थानिक पोलिसांनी तपास सुरु केला आहे. कपिल शर्मा आणि त्याच्या कुटुंबाची सुरक्षा वाढवण्यात आली आहे. तसेच भारत सरकारकडूनही या प्रकरणाची माहिती घेतली जात असून, NIA मार्फत लाड्डीविरोधात आंतरराष्ट्रीय स्तरावर कठोर कारवाईची मागणी होण्याची शक्यता आहे.
