Shani Shingnapur Scam | महाराष्ट्रातील कोट्यवधी भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या शनिशिंगणापूर मंदिर ट्रस्टवर अखेर देवेंद्र फडणवीस सरकारने कठोर निर्णय घेतला आहे. तब्बल ५०० कोटींच्या कथित घोटाळ्यामुळे या ट्रस्टच्या विश्वस्त मंडळाला बरखास्त करण्यात आलं आहे. यासंदर्भात शुक्रवारी विधीमंडळात मोठी घोषणा करण्यात आली आणि एकाच खळबळ उडाली. (Shani Shingnapur Scam)
भाजप आमदार सुरेश धस आणि स्थानिक आमदार विठ्ठल लंघे यांनी या घोटाळ्याचे गंभीर आरोप विधानसभेत मांडले होते. त्यानंतर लगेचच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंदिर ट्रस्टच्या मालमत्तांची चौकशी व सर्व संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत. या निर्णयामुळे भ्रष्टाचार करणाऱ्या विश्वस्तांच्या पाठी ‘शनिची साडेसाती’ लागल्याची चर्चा राज्यभर सुरू झाली आहे.
बनावट ॲप, भाविकांची फसवणूक, कोट्यवधींची देणगी गायब :
या महाघोटाळ्याच्या मुळाशी एक बनावट अॅप स्कॅम असल्याचं समोर आलं आहे. आमदार विठ्ठल लंघे यांच्या मते, विश्वस्तांनी बनावट मोबाईल ॲप तयार करून देश-विदेशातील लाखो भाविकांकडून पूजेसाठी देणग्या गोळा केल्या. या ॲप्सवर अंदाजे तीन ते चार लाख भाविकांनी पैसे पाठवले. यामध्ये फसवणूक झाल्याची तक्रार अनेकांकडून आली आहे. (Shani Shingnapur Scam)
याशिवाय, ट्रस्टमध्ये बोगस भरती प्रक्रिया, निधीचा गैरवापर, व धर्मादाय विभागातील अधिकाऱ्यांच्या संगनमताचे आरोपही लंघे व धस यांनी केले आहेत. सुरेश धस यांच्या मते हा घोटाळा तब्बल ५०० कोटी रुपयांचा असून, यातील काही व्यवहार ठोस पुराव्यांसह सादर करण्यात आले आहेत. त्यामुळे कारवाई अपरिहार्य होती.
Shani Shingnapur Scam | शिर्डी- पंढरपूरच्या धर्तीवर समिती स्थापन होणार :
या घोटाळ्याच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने शिर्डी आणि पंढरपूर संस्थानांप्रमाणे शनिशिंगणापूर मंदिराच्या व्यवस्थापनासाठी शासकीय समिती स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. ही समिती लवकरच कार्यभार स्वीकारणार असून, ट्रस्टच्या मालमत्तांची आणि खात्यांची सखोल चौकशी केली जाईल.
या कारवाईत धर्मादाय विभागातील वरिष्ठ अधिकारीही रडारवर आले आहेत. त्यांच्यावरही कारवाई होणार असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले आहे. भाविकांच्या श्रद्धेचा गैरफायदा घेणाऱ्यांवर सरकारची वक्रदृष्टी आता अधिक तीव्र झाली आहे.
