हिंदी सक्तीविरोधातील यशानंतर मनसेने आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी कंबर कसली आहे. गेल्या काही दिवसांपासून या निवडणुकांमध्ये दोन्ही ठाकरे बंधूंच्या युतीसंदर्भात चर्चा होत आहेत. त्यापार्श्वभूमीवर मनसे नेते राज ठाकरे हे अॅक्शन मोडवर आले असून मनसेकडून उद्यापासून तीन दिवसीय राज्यस्तरीय शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.या शिबिरासाठी मनसेने एकेकाळी आपला बालेकिल्ला असलेल्या नाशिकची निवड केली आहे. जिल्ह्यातील इगतपुरी येथील कॅमल रिसॉर्ट येथे मनसेचे तीन दिवसीय शिबिर होणार आहे. हे शिबिर आजपासून (दि. १४ जुलै) सुरू होणार असून १६ जुलैपर्यंत चालणार आहे. या शिबिरात संपूर्ण राज्यभरातून मनसेचे नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत. सोमवारी सकाळी १० वाजता ‘कपड्यांची बॅग घेऊन शिवतीर्थावर हजर रहा. दोन दिवसांसाठी मुंबईबाहेर कार्यशाळेसाठी जायचे आहे, असे फर्मान राज ठाकरेंनी जारी केल्याचे सांगितले जात आहे. राज ठाकरे स्वतः या शिबिरात उपस्थित राहणार असून आगामी निवडणुकांसाठी पक्षाची रणनीती यावर सखोल चर्चा होणार असल्याची माहिती आहे
