नवी दिल्ली – आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकात (आयएसएस) १८ दिवस राहिल्यानंतर भारतीय अंतराळवीर शुभांशू शुक्ला यांच्यासह चारही अंतराळवीर मंगळवारी पृथ्वीवर सुखरूप परतले आहेत. ‘ॲक्सिओम-४’ या अंतराळ मोहिमेतील सदस्य १८ दिवस आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकात राहिले. त्यानंतर चारही अंतराळवीर आंतरराष्ट्रीय स्थानकामधून सोमवारी भारतीय वेळेनुसार सायंकाळी ४.५० वाजता पुन्हा पृथ्वीवर येण्यासाठी परतीच्या प्रवासाला निघाले होते.
शुभांशू शुक्ला यांच्यासह चारही अंतराळवीरांचे अंतराळयान मंगळवारी कॅलिफोर्नियाजवळील समुद्रात लँडिंग झाले. या सर्वांनी ही मोहीम यशस्वी पार पाडल्याबद्दल आनंद व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान, कॅलिफोर्नियातील समुद्रकिनाऱ्याजवळ शुभांशू शुक्ला आणि इतर अंतराळवीरांना घेऊन येणारे यान उतरल्यानंतर सर्व अंतराळवीरांना यानातून सुखरूपपणे बाहेर काढून वैद्यकीय तपासणीसाठी नेण्यात आले. आता त्यांना सुमारे १० दिवस क्वारंटाईनमध्ये ठेवले जाणार असून, यादरम्यान त्यांच्या प्रकृतीवर बारीक लक्ष ठेवण्यात येणार आहे.
