पंढरपूर – विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीकडून आषाढी यात्रेत मंडप व दर्शन मंडपाचा ठेका देण्यासाठी पैसे घेतल्याचे प्रकरण ताजे असतानाच आता कर्मचाऱ्यांनी मंदिर समितीचे व्यवस्थापक मनोज श्रोत्री यांच्या विरोधातील पत्र व्हायरल झाले आहे.आषाढी यात्रा २०२५ दर्शनासाठी पत्राचे टेंडर देण्याचे आमिष दाखवून पुरुषोत्तम सग्गम (रा. सोलापूर) यांच्याकडून चार लाख ७० हजार रुपये घेतल्याचे प्रकरण पुढे आले आहे. तसेच स्वतःचे एजंट नेमून व्हीआयपी दर्शनाच्या माध्यमातून भ्रष्टाचार होतोय, अशा अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी संभाजी ब्रिगेड व अन्य संघटनांनी केली होती.
आम्ही गेल्या २५ ते ३० वर्षापासून प्रामाणिकपणे विभागप्रमुख या पदावर मंदिर समितीच्या कामाचा दर्जा सुधारून मंदिराचा महाराष्ट्रात तसेच देशात मंदिरे समितीचे नावलौकिक होण्याच्या दृष्टीने सेवा बजावीत आलो आहोत. परंतु मागील काही महिन्यांपासून मंदिर समितीच्या व्यवस्थापकांकडून विभाग प्रमुख या पदाची नाहक बदनाम केली जात आहे. वारंवार व्यवस्थापक यांच्याकडून अपमानित करण्यात येते. यामुळे आम्ही विभाग प्रमुख या पदावर काम करू इच्छित नाही, असे निवेदन विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांना २१ मे २०२५ रोजी मंदिर समितीतील विभाग प्रमुखांनी दिले होते.
या निवेदनावर विनोद पाटील, पृथ्वीराज राऊत, राजेंद्र सुभेदार, पांडुरंग बुरांडे, बलभीम पावले, संजय कोकीळ, ज्ञानेश्वर कुलकर्णी आदींच्या सह्या आहेत
