पंढरपूर – समाजातल्या शेवटच्या व्यक्तीला समाजाच्या मुख्यधारेत आणणाऱ्या आणि भागवत धर्माचा विचार आपल्या लेखणी व वाणीने देशभर पोहोचविणाऱ्या संत नामदेव महाराज यांच्या पंढरपूर येथील मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात येईल. संत नामदेव महाराजांच्या समाधिस्थळी वैश्विक दर्जाचे स्मारक उभारतांना निधीची कमतरता भासू दिली जाणार नाही. त्यांचे विचार हे त्यांचे खरे स्मारक असून, हे विचार विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी शासन स्तरावर प्रयत्न करण्यात येईल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.पंढरपूर येथे आयोजित संत नामदेव महाराज, संत जनाबाई यांच्या षष्ठ शतकोत्तर संजीवन समाधी सोहळा कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी पालकमंत्री जयकुमार गोरे, आमदार समाधान आवताडे, आमदार अभिजित पाटील, आमदार रणजीतसिंह मोहिते पाटील, माजी आमदार प्रशांत परिचारक, विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, नामदेव क्षत्रिय एकसंघाचे अध्यक्ष महेश ढवळे उपस्थित होते.
भाषा संवादाचे साधन..
मराठीच्या गजलांचे मूळही संत नामदेवांपर्यंत पोहोचतं. हिंदी साहित्याला नवे भान देण्याचे कार्य केले. त्यांनी हिंदी आणि पंजाबीत अभंग लिहिले. ब्रज भाषा आणि शौरसेनी भाषा त्यांना अवगत होत्या. भाषा हे संवादाचे साधन आहे, विवादाचे साधन नाही, हे त्यांनी दाखवून दिले. भाषा ही मैत्री आणि बंधुत्वाचा धागा आहे हे त्यांनी जाणून घेतले होते, असेही फडणवीस म्हणाले.
गॉगलद्वारे विठ्ठलाची विविध रूपे आता देशभरातील भाविकांना पाहता येणार
पंढरपूर विठ्ठलाची महापूजा आणि विविध रूपे सर्वसामान्य भाविकांना पाहता यावीत यासाठी विठ्ठल मंदिरात व्हीआर दर्शन सुविधेचा शुभारंभमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते बुधवारी झाला. गॉगलद्वारे देवाची विविध रूपं आता देशभरातील भाविकांना पाहायला मिळणार आहे. यापूर्वी उज्जैन आणि काशी विश्वेश्वर या देशातल्या दोन ठिकाणी अशा पद्धतीची सुविधा उपलब्ध आहे.यावेळी मंदिर समितीच्यावतीने मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या हस्ते मुख्यमंत्री फडणवीस यांचा सत्कार करण्यात आला.यावेळी पालकमंत्री जयकुमार गोरे, आ. समाधान आवताडे, अभिजित पाटील, गोपीचंद पडळकर, विभागीय आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार, जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम, जिल्हा पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी, कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके, मंदिर समितीचे सदस्य संभाजी शिंदे उपस्थित होते.
विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीचे भक्तनिवास व शहरातील इतर ठिकाणी भाविकांना देवाच्या पूजा व्हीआर गॉगलद्वारे पाहता येणार आहेत. अल्प शुल्क असलेल्या या सुविधेमुळे भाविकांना थेट देवाच्या गाभाऱ्यात उभे राहून समक्ष पाहिल्याचा आभास निर्माण होणार आहे. वर्षभरात विठुरायाच्या केवळ मोजक्याच महापूजा होतात, तुलनेत अनेक भाविकांना या महापूजेस उपस्थित राहण्याची इच्छा असल्याने या गॉगलच्या माध्यमातून या महापूजेचा आनंद भाविकांना घेता येणार आहे.
संतांचे विचार समाजापर्यंत पोहोचले पाहिजेत
संतांचे जीवन प्रेरणादायी असून, त्यांच्या जीवनकार्यातून आपल्याला विचारच नाही तर जीवनाचा मार्गही गवसतो. संत नामदेवांनी भागवत धर्माला वैश्विक धर्म केले आणि वारकरी विचाराला देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचवले. वारकरी संप्रदायात त्यांचे कार्य महान होते. अशा संतांचे विचार समाजापर्यंत पोहोचले पाहिजे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
