बार्शी – बार्शी तालुक्यातील मागील थकीत पीक विम्याची रक्कम त्वरित देऊन पीक विम्याचे राज्य प्रमुख विनय आवटे यांच्या संपत्तीची चौकशी करण्याची व शेतकऱ्यांना कर्जमुक्ती द्या, आदी मागण्यांसाठी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष शंकर गायकवाड यांनी शेतकऱ्यांसह बार्शी-धाराशिव रस्त्यावर चिखर्डे येथे गुरुवारी तासभर रास्ता रोको आंदोलन केले.मागण्यांची पूर्तता लवकर न झाल्यास जिल्हा व राज्यस्तरीय अधिकाऱ्यांची कार्यालये, पीक विमा कंपन्या, संबंधित मंत्र्यांच्या घरासमोर तसेच मंत्रालयावर आंदोलन करण्याचा इशारा यावेळी शंकर गायकवाड यांनी दिला.यावेळी निवेदन तहसीलचे प्रतिनिधी नारीच्या महिला मंडळ अधिकारी एम. व्ही. राजपूत यांना देण्यात आले. या रास्ता रोको आंदोलनात तालुकाध्यक्ष शरद भालेकर, उपाध्यक्ष प्रशांत काळदाते, दिगंबर रणखांब, रामभाऊ काटे, काकासाहेब गलांडे, अभिजित शिंदे, पप्पू कोंढारे, गजानन शाखापुरे, नितीन कोंढारे, यशवंत मोरे, ज्ञानदेव कोंढरे, रघुनाथ कोंढारे, प्रकाश उकिरडे, महेंद्र गलांडे, रामहरी पेजगुडे, सुनील अडसूळ, राहुल कोंढारे, संभाजी भोसले, मामासाहेब ढवळे, बालाजी निंबाळकर, आदींसह शेतकरी व महिला उपस्थित होत्या. यावेळी पांगरी पोलिस स्टेशनचे पो. उपनिरीक्षक राजकुमार यावलकर व त्यांच्या सहकाऱ्यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.
मंगळवेढ्यात घोषणाबाजी
मंगळवेढा : शेतकऱ्यांच्या विविध मागण्या व दिव्यांगांच्या मानधनवाढीसाठी गुरुवारी मंगळवेढा येथे प्रहार दिव्यांग संघटनेच्या वतीने रास्तारोको, चक्काजाम आंदोलन करण्यात आले. कर्जमाफी झालीच पाहिजे, शेतकऱ्यांचा सात-बारा तत्काळ कोरा करा, दिव्यांगांना मानधनवाढ झालीच पाहिजे, अशा घोषणांनी दामाजी चौक दणाणून गेला होता. यावेळी सिद्धराम माळी, समाधान हैंबाडे, बापू घोडके, पिंटू कोळेकर, राहुल खांडेकर, रामचंद्र मेटकरी, भारत आसबे, रोहिदास कांबळे, सर्जेराव पाराध्ये, संभाजी मस्के, शिवानंद नरळे, विजय तेली, रुक्मिणी कोकरे, शहराध्यक्ष सविता सुरवसे, शालन काळे आदी पदाधिकारी उपस्थित होते.
सांगोल्यात तासभर मांडला ठिय्या
सांगोला – प्रहार संघटनेच्या वतीने गुरुवार, दि. २४ जुलै रोजी सकाळी सांगोला वासूद चौक येथे रास्ता रोको आंदोलन करून ठिय्या मांडला. सुमारे तासभर चाललेल्या या आंदोलनामुळे दोन्ही बाजूची वाहतूक ठप्प झाल्याने वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. या आंदोलनाला शेकापचे आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रताप देशमुख, न्यू रासप पक्षाचे आर. वाय. घुटुकडे, संभाजी ब्रिगेडचे अरविंद केदार, मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष विनोद बाबर, उद्धवसेनेचे शहरप्रमुख तुषार इंगळे, प्रहारचे प्रफुल बंडगर आदींनी पाठिंबा दर्शविला. सांगोला मंडळ अधिकारी जाधव व पोलिस निरीक्षक चंद्रकांत पुजारी यांना निवेदन देऊन आंदोलन स्थगित केल्याचे तालकाध्यक्ष सतीश दीडवाघ यांनी सांगितले.
यावली चौकात आंदोलनानंतर निवेदन देताना संभाजी ब्रिगेडचे पदाधिकारी,
यावली चौकात चक्का जाम
वैराग– वैराग माढा मार्गावरील यावली चौकात शेतकऱ्यांच्या सरसकट कर्जमाफीसह विविध मागण्यांसाठी गुरुवारी संभाजी ब्रिगेडच्या वतीने रोडवर चक्का जाम आंदोलन केले. संभाजी ब्रिगेडचे बार्शी तालुका प्रमुख आनंद काशीद यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या शांततापूर्ण आंदोलनात शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची मुख्य मागणी पुन्हा एकदा लावून धरण्यात आली. यासोबतच, शेतमालाला हमीभावापेक्षा २० टक्के जास्त प्रोत्साहन रक्कम मिळावी आणि दिव्यांग व विधवांना ६ हजार रुपये मासिक अनुदान मिळावे, या मागण्या करण्यात आल्या. शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी गावागावांत जनजागृती सुरू असून मागण्या मान्य न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा शेतकऱ्यांच्या वतीने देण्यात आला. आंदोलना दरम्यान निवेदन देण्यात आले. निवेदन मंडळ अधिकारी शरद शिंदे यांनी स्वीकारले. पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.
