अकलूज– केंद्र स्थापन करण्याबाबत खा. धैर्यशील मोहिते पाटील यांनी नवी दिल्लीत केंद्रीय संचार मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांची भेट घेऊन मागणी केली. अकलूज हे सोलापूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे व्यापारी व शैक्षणिक केंद्र आहे. सध्या अकलूज मध्ये पासपोर्ट सेवा उपलब्ध नसल्याने माळशिरस तालुक्यातील सीमावर्ती भागातून स्थानिक नागरिकांना माढा (१०० किमी) या दूर असलेल्या केंद्रावर जावे लागते. या केंद्रावर अतिरिक्त ताण असल्याने अपॉइंटमेंटसाठी १५ दिवसांहून अधिक प्रतीक्षा करावी लागत असल्याने नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो. त्यामुळे त्यांचा वेळ व पैसा दोन्ही खर्च होतो. अकलूज येथे पासपोर्ट सेवा केंद्र उपलब्ध झाल्यास नागरिकांना मोठा दिलासा मिळेल. विशेषतः विद्यार्थी, व्यावसायिक व परदेशात नोकरीसाठी जाणाऱ्या तरुणांना याचा फायदा होईल. याबाबत केंद्रीय संचार मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी या मागणीचा सकारात्मक विचार करुन लवकरात लवकर आवश्यक ती कार्यवाही करण्याचे आश्वासन दिल्याचे खा. मोहिते-पाटील यांनी सांगितले.
