मराठीच्या मुद्द्यासाठी एकत्र आल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्र आनंदी झाला असतानाच, आता २२ दिवसांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी थेट ‘मातोश्री’वर जात उद्धव ठाकरेंना चकित केले. संपूर्ण राज्यातून वाढदिवसाच्या शुभेच्छा मिळत असतानाच, तब्बल सहा वर्षांनी राज ठाकरे मातोश्रीवर आले, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना मिठी मारली आणि नंतर त्यांना पुष्पगुच्छ देऊन वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.
मुलगा अमित ठाकरे यांच्या लग्नाचे आमंत्रण देण्यासाठी राज ठाकरे यांनी ६ वर्षांपूर्वी म्हणजेच जानेवारी २०१९ मध्ये ‘मातोश्री’ला भेट दिली होती. त्यापूर्वी हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आजारी असताना, राज ठाकरे हे २०१२ मध्ये औपचारिकपणे ‘मातोश्री’वर गेले होते. मात्र, आता हिंदी सक्तीच्या मुद्द्यावरून एकत्र आल्यानंतर राज यांनी रविवारी ‘मातोश्री’वर येऊन उद्धव ठाकरेंना शुभेच्छा दिल्यामुळे सत्ताधारी महायुतीच्या नेत्यांनी आश्चर्य व्यक्त केले.
जवळपास २० मिनिटे चर्चा
‘मातोश्री’वर आल्यानंतर उद्धव आणि राज यांच्यात जवळपास २० मिनिटे चर्चा झाली. दोघांमध्ये काही मिनिटे राजकारणाव्यतिरिक्त इतर विषयांवरही गप्पा झाल्या. उद्धव ठाकरे यांना शुभेच्छा दिल्यावर राज ठाकरेंनी स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या खुर्चीचे दर्शन घेतले. बाळासाहेबांच्या फोटोसमोर ते नतमस्तक झाले. यावेळी ठाकरे गटाकडून विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, खासदार संजय राऊत, वैभव नाईक तसेच मनसेकडून बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई उपस्थित होते.
राजच्या शुभेच्छा ही फारच महत्त्वाची बाब!
“राज आल्याने वाढदिवसाचा आनंद द्विगुणितच नाही, तर कित्येक पटीने गुणित झाला आहे. पुढचे सगळे काही चांगले होईल, याचा मला विश्वास आहे. अनेक वर्षांनी आम्ही दोन भाऊ एकत्र भेटलो. ज्या घरात एकत्र राहिलो, वाढलो तिथे आम्ही गेलो. ज्यांनी आम्हाला वाढवले, त्या बाळासाहेबांपुढे नतमस्तक झालो. बऱ्याच वर्षांनी राजने घरी येऊन शुभेच्छा दिल्या. त्यामुळे कित्येक पटीने मला आनंद झाला आहे. माझ्यासाठी ही बाब फारच महत्त्वाची आहे,” अशा शब्दांत उद्धव ठाकरेंनी या भेटीबाबत प्रतिक्रिया दिली.
