पंढरपूर – प्रस्तावित पंढरपूर कॉरिडॉरची सीमा जवळपास निश्चित झाली असून, १५० मीटर रुंदी आणि चौफाळा ते महाद्वार असा ४५० मीटर लांबीच्या क्षेत्रात कॉरिडॉर राबवला जाणार आहे. यासाठी ६७ हजार चौरस मीटर जागा बाधित होणार आहे. यापैकी सुमारे ४८ हजार चौरस मीटर जागा संपादित करवी लागणार आहे. त्यासाठी शासनाने भूसंपादन प्रक्रिया गतिमान केली आहे. हा कॉरिडॉर चौफाळा चौकातून राबविण्याऐवजी तो छत्रपती शिवाजी महाराज चौकातून सुरु करण्याची मागणी काही संघटनांमधून पुढे आली आहे.पंढरपूर येथील श्री विठ्ठल मंदिर परिसरात कॉरिडॉर राबवण्यात येणार आहे. यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तीन दिवसांपूर्वी बैठक घेऊन सूचना केल्या आहेत. शिवाय उपजिल्हाधिकारी दर्जाच्या तीन अधिकाऱ्यांची नियुक्ती करून बाधित नागरिकांशी संवाद साधला जात आहे शुक्रवारी (२५ जुलै) रोजी भूसंपादन अधिकारी संतोष देशमुख यांनी चर्चेसाठी बोलावलेल्या नागरिकांना कॉरिडोरच्या प्रस्तावित जागेसंदर्भात माहिती दिली आहे.
शासनाच्या मंजुरीनंतर सप्टेंबरअखेर भूसंपादन प्रक्रिया सुरू होईल
बाधित होणाऱ्या सुमारे ६०० मालमत्ताधारकांशी शासन चर्चा करीत आहे. त्यांना देण्यात येणाऱ्या नुकसान भरपाईचे आणि पुनर्वसनाचे स्वरूप निश्चित केले जात आहे. ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात विकास आराखड्यातील बदल प्रस्तावित करत आहोत, एक महिन्याची मुदत दावे आणि हरकतीसाठी दिली जाईल. त्यानंतर सुनावणी होऊन शासनाकडे अहवाल दिला जाईल. शासनाच्या मंजुरीनंतर सप्टेंबर अखेर भूसंपादन प्रक्रिया सुरू होईल, असे भूसंपादन अधिकारी संतोष देशमुख यांनी सांगितले.
दीडशे मीटर रुंदीवर कॉरिडॉर राबवा
चौफाळा ते महाद्वार घाट या सुमारे ४५० मीटर लांब आणि भाजी मंडई ते कटेकर बोळ, असा १५० मीटर रुंदीच्या जागेवर कॉरिडोर राबवण्यात येणार आहे
