मंगळवेढा– मंगळवेढा जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीचे वारे मंगळवेढा तालुक्यात वाहू लागले आहे. आ. समाधान आवताडे, माजी आमदार प्रशांत परिचारक, भालके गट, ज्येष्ठ नेते बबनराव आवताडे हे चार राजकीय गट व्यूहरचना निश्चित करण्यासाठी कार्यकर्त्यांशी बोलून परिस्थितीचा आढावा घेत आहेत. दरम्यान, पक्षीय राजकारणापेक्षा आ. समाधान आवताडे गट विरुद्ध विरोधक अशीच लढत होणार निवडणुकीत होण्याची चिन्हे आहेत.तालुक्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर गट आणि गण रचना फेरबदल होणार की काय, याबाबत उत्सुकता होती. मात्र, तालुक्यातील ४ जिल्हा परिषद गट आणि ८ पंचायत समिती गण जसेच्या तसेच राहिले. इच्छुक उमेदवारांना आता आरक्षण सोडतीचे वेध लागले आहेत. राजकीय पक्षांनी नव्याने रणनीती आखत आहेत. कोणत्याही गट किंवा गणामध्ये फेरबदल न झाल्यामुळे अनेक दिग्गजांनी सुटकेचा निश्वास टाकला आहे.विधानसभा निवडणुकीत १ लाख १५ हजार मते मिळालेले भगीरथ भालके हे निवडणुकीनंतर सध्या मतदारसंघात फारसे सक्रिय नाहीत. हे ओळखून आवताडे गटाने भालके गटातील जे कार्यकर्ते त्यांना आपलेसे करण्याबाबत फिल्डिंग लावली आहे.
परिचारक-आवताडे एकत्र लढणार का?
बरेचसे कार्यकर्ते भगीरथ भालके पुन्हा सक्रिय होतील ही अपेक्षा ठेऊन आहेत. गत विधानसभा निवडणुकीत पक्षाच्या आदेशाने शेवटच्या क्षणी एकत्र आलेला परिचारक व आ आवताडे गट स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत महायुती म्हणून एकत्र लढणार की वेगळी भूमिका घेणार यावर निवडणुकीचे चित्र रंगणार आहे.
दरम्यान, प्रशांत परिचारक यांच्या नेतृत्वाखाली दामाजी शुगर चेअरमन शिवानंद पाटील यांनी पांडुरंग परिवारातील निष्ठावंत कार्यकर्त्यांना झेडपी पंचायत व नगरपालिका निवडणुकीत लोकप्रतिनिधित्व मिळावे यासाठी रणनीती आखत आहेत. त्याचबरोबर सहकारी संस्थाच्या माध्यमातून तालुकाभर कार्यकर्त्यांचे जाळे असणारे डिसीसीचे माजी व्हा. चेअरमन बबनराव आवताडे, सिद्धेश्वर आवताडे गटाच्या भूमिकेला ही या निवडणुकीत महत्त्व असणार आहे.
भालकेंच्या भूमिकेकडे लक्ष..
भगीरथ भालके हे शिवसेना एकनाथ शिंदे गटात जाणार अशी चर्चा रंगली. मात्र, त्यानंतर चर्चा थांबल्या. त्यामुळे भालकेची भूमिका काय असणार हे गुलदस्त्यात आहे. भालकेचे दुर्लक्ष झाल्याचे ओळखून खासदार प्रणिती शिंदे यांनी मंगळवेढा तालुक्यात वारंवार दौरे काढून जनसंपर्क ठेवला आहे. राष्ट्रवादी शरद पवार गट, अजित पवार गट, उद्धवसेना गट, शिंदेसेना गट, मनसे यासह इतर पक्ष संघटनाचीही ताकद काही भागांत निर्णायक ठरू शकते.
मंगळवेढा तालुक्यातील गट व गण
संत दामाजी नगर दामाजी नगर, बोराळे
हुलजंती – मरवडे, हुलजंती
लक्ष्मी दहिवडी – चोखामेळा नगर,
लक्ष्मी दहिवडी
भोसे – रेड्डे, भोसे
