पंढरपूर – नीरा व भीमा खोऱ्यात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे नीरा व उजनी धरण भरले आहे. या धरणांमधून भीमेत १ लाख १० हजारांचा विसर्ग सुरू आहे, तर पंढरपूर येथे ८० हजारांचा विसर्ग सुरू आहे. यामुळे पंढरपूर येथे भीमा (चंद्रभागा) इशारा पातळीवरून वाहत आहे. रात्री उशिरापर्यंत पंढरपूर येथे १ लाख १० हजाराचा विसर्ग येणार आहे. इशारा पातळीवरून वाहणारी भीमा नदी धोक्याच्या पातळीवरून वाहत आहे. व्यासनारायण झोपडपट्टी येथील नागरिकांना स्थलांतर करावे लागण्याची शक्यता आहे.दोन्ही धरणांतून विसर्ग सोडण्यात आल्याने भीमा नदी दुथडी भरून वाहत आहे. नदीकाठच्या परिसरात पूरसदृश परिस्थिती आहे. पाणी घाटांना लागले आहे. कोल्हापूर पद्धतीचे उंबरे, आव्हे, पटवर्धन कुरोली, गुरसाळे, पंढरपूर, विष्णुपद, अजनसोंड, बठाण हे आठही बंधारे पाण्याखाली गेले आहेत. नदीकाठच्या गावांमध्ये सतर्कतेचा इशारा दिला आहे.दरम्यान, प्रशासन सतर्क झाले आहे. पुराचे पाणी अंबाबाई पटांगण परिसरातील व्यासनारायण झोपडपट्टीत जाण्याची शक्यता आहे.
उजनी तसेच वीर धरणातून होणारा पाण्याचा विसर्ग वाढला आहे. त्यामुळे चंद्रभागेचे पात्र पूर्ण भरून निम्मे घाटही पाण्यात बुडाले आहेत. दौंडमधून उजनीत होणारा विसर्ग वाढल्यामुळे भीमा नदीत होणाऱ्या विसर्गात ही वाढ झाली आहे.
सध्या पुणे जिल्ह्यात जोरदार पाऊस झाल्यामुळे तेथील धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग उजनी धरणात होत आहे. चंद्रभागा नदीतील पाणी पातळी वाढली आहे. श्रावण महिना असल्यामुळे पंढरपुरात भाविकांची गर्दी आहे. चंद्रभागा नदी दुथडी भरून वाहत असली तरी भाविक चंद्रभागेमध्ये स्नान करण्यासाठी घाटावर गर्दी करताहेत.
वडिवळी धरण, आंध्रा धरण, वासर साई धरण, मुळशी धरण, खडकवासला धरण आणि घोड धरण या धरणातून थेट पाण्याचा विसर्ग होत आहे. सध्या उजनीतून ७१ हजार ६०० चा विसर्ग भीमा नदीत तर वीर धरणातून १३९७३ क्युसेकने विसर्ग भीमा नदीत होत आहे. एकूण सहा धरणांतून भीमा नदीत पाण्याचा विसर्ग सुरू आहे.
प्रशांत माने, शाखा अभियंता, उजनी धरण व्यवस्थापन विभाग
भाविकांनी स्नानासाठी चंद्रभागेच्या पात्रात जाऊ नये म्हणून रिक्षातून पुकारून खबरदारीच्या सूचना केल्या जात आहेत. बॅरिकेटिंग लावले आहेत, बोर्ड लावले आहेत. बोटीतूनही फिरून चंद्रभागेच्या पात्रात स्नानासाठी भाविकांनी उतरू नये, म्हणून सांगितले जात आहे. रस्ताही बंद केलेला आहे.
सचिन लंगोटे, तहसीलदार, पंढरपूर
एवढा विसर्ग आल्यास बाधित होणारे क्षेत्र..
सोलापूर-पंढरपूर जुना दगडी पूल – २६ हजार क्युसेक
नगरपालिका बंधारा पंढरपूर – ३५ हजार क्युसेक
भीमा नदीवरील को.प. बंधारे – ४० हजार क्युसेक
जुना गोपाळपूर पूल – १ लाख ७ हजार क्युसेक (वाहतूक पूर्ण बंद)
व्यासनारायण झोपडपट्टी – १ लाख १५ हजार क्युसेक (नागरिकांचे स्थलांतर)
नवीन गोपाळपूर पूल – १ लाख ६० क्युसेक (वाहतूक पूर्ण बंद)
संतपेठ झोपडपट्टी – १ लाख ८० हजार क्युसेक (नागरिकांचे स्थलांतर
