पंढरपूर- पंढरपूर येथे इशारा पातळीवरून धोक्याच्या पातळीकडे मार्गक्रमण करणाऱ्या चंद्रभागा नदीचा विसर्ग कमी होऊ लागला आहे. यामुळे चंद्रभागेचा पंढरपूर येथील पुराचा धोका सध्यातरी टळला आहे. यामुळे व्यासनारायण झोपडपट्टी येथील नागरिकांनी सुटकेचा निःश्वास टाकला आहे. पुराचे पाणी आता ओसरू लागले असले तरी कोल्हापूर पद्धतीचे बंधारे अद्यापही पाण्याखाली आहेत.
नीरा व भीमा खोऱ्यात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे नीरा व उजनी धरण ९८ टक्के भरले आहे. उजनीतून भीमेत ७१ हजारांचा तर वीर धरणातून ३० हजारांचा विसर्ग सुरू होता; मात्र बुधवारी पहाटे उजनीतून १० हजारांचा विसर्ग कमी करण्यात आला. त्यामुळे पंढरपूर येथे सुरू असलेला विसर्ग कमी होऊन ९० हजारांवर आला आहे. पुराचा धोका टळला तरी पंढरपूर येथे भीमा (चंद्रभागा) इशारा पातळीवरून वाहत आहे. सर्व पाणी पुराचे पाणी भीमा नदीला येऊन मिळणाऱ्या ओढ्यांद्वारे मागे सरकत असल्यामुळे शेतात पाणी शिरले आहे. याचा फटका पंढरपूर तालुक्यातील शेती पिकांना बसत आहे.
वाहतूक बंद
चंद्रभागा वाळवंटातील भक्त पुंडलिक मंदिरासह इतर मंदिरे पुराच्या पाण्यात अर्धी बुडाली आहेत. मंदिरांना पाण्याचा वेढा कायम आहे. तर कोल्हापूर पद्धतीचे उंबरे, आव्हे, पटवर्धन कुरोली, गुरसाळे, पंढरपूर, विष्णूपद, अजनसोंड, बठाण हे आठही बंधारे पाण्याखाली आहेत. तेथील वाहतूक तीन दिवसांपासून बंदच आहे. नदीकाठच्या गावांमध्ये प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
तरीही भाविक स्नानासाठी नदीपात्रात
भीमेला (चंद्रभागा) नदीला पूरसदृश परिस्थिती निर्माण झाल्याने प्रशासनाने सतर्कता बाळगायला हवी. मात्र, तसे होताना दिसत नाही. सध्या चंद्रभागा नदीं इशारा पातळीवरुन वाहत आहे. सर्व बंधारे पाण्याखाली आहेत. घाटांवर पाणी आले आहे; मात्र तरीदेखील भाविक नदीपात्रात उतरून स्नान करताना दिसून येतात.
