वॉशिंग्टन – सध्या कृत्रिम बुद्धिमत्तेचे वर्चस्व सर्वच क्षेत्रात वाढत आहे. आता आपण संगणक, लॅपटॉपचा वापर करताना माऊस, की-बोर्डचा वापर करतो. ते केल्याशिवाय आपल्याला संगणक-लॅपटॉप वापरता येत नाही. पण, केवळ पाच वर्षे थांबा, तुमच्या नुसत्या आवाजावर लॅपटॉप व संगणक चालणार आहे. हे सर्व शक्य होणार आहे, कृत्रिम बुद्धिमत्तेने (एआय).
२०३० पर्यंत आपल्याला असे लॅपटॉप, संगणक पाहायला मिळतील त्यात कीबोर्ड किंवा माऊसची गरज नसेल. हे लॅपटॉप, संगणक केवळ आवाज किंवा इशाऱ्यावर काम करायला लागतील. हे तुम्हाला कदाचित खोटे वाटेल.
मायक्रोसॉफ्टने यूट्यूबवर एक व्हिडीओ टाकला आहे. त्यात सांगितले की, येत्या पाच वर्षांत आम्ही विंडोजचा वापर कसा करणार आहोत. ‘एआय’मुळे संगणक व लॅपटॉप यांच्यासोबत आवाजाद्वारे संवाद साधणे शक्य होणार आहे.
मायक्रोसॉफ्टचे कॉर्पोरेट उपाध्यक्ष डेव्हीड वेस्टन यांनी सांगितले की, आजची ‘जनरेशन झेड’ जुनी ‘डॉस’ यंत्रणा वापरत नाही. त्याचप्रमाणे येत्या काळात माऊस, कीबोर्डचा वापर बंद होऊ शकतो. २०३० पर्यंत लोक आपल्या संगणकावर आवाज व इशाऱ्यातून कामे करू शकतील. हे संवादाचे सोपे माध्यम बनेल.
‘को-पायलट एआय चॅटबॉट’ सुरू
मायक्रोसॉफ्टला वाटते की, डेस्कटॉप किंवा लॅपटॉपशी नागरिकांनी मित्रासारख्या गप्पा मारायला हव्यात. हे तंत्रज्ञान विकसित करायला मायक्रोसॉफ्ट अब्जावधी रुपये खर्च करत आहे. कंपनीने विंडोज व ऑफीसमध्ये ‘को-पायलट एआय चॅटबॉट’ जोडले आहे. याचा वापर करताना वापरकर्ते ‘हे को-पायलट’ बोलून संगणकाकडून काम करून घेऊ शकतो. यामुळे सिस्टीम बदलणे व इंटरनेटवर माहिती शोधणे सोपे बनेल.
‘एआय’च्या मदतीने सुरक्षा तज्ज्ञ मिळेल
वेस्टन म्हणाले की, येत्या पाच वर्षांत ‘एआय’च्या मदतीने सुरक्षा तज्ज्ञ मिळेल. तो माणसाप्रमाणे गप्पा मारेल. ही सुरक्षा सध्या केवळ मोठ्या कंपन्यांसाठी आहे. छोट्या व्यापाऱ्यांसाठीही ही सुविधा लागू केली जाईल.
