नवी दिल्ली – सुप्रीम कोर्ट, हायकोर्ट हे समान पातळीवर आहेत. या दोन्ही न्यायालयांमध्ये कोणीच वरिष्ठ किंवा कनिष्ठ नाही, असे प्रतिपादन सरन्यायाधीश भूषण गवई यांनी केले.
स्वातंत्र्य दिनाच्या ७९ व्या वर्धापन दिनानिमित्त सुप्रीम कोर्टाच्या बार असोसिएशनने आयोजित केलेल्या कार्यक्रमात सरन्यायाधीश गवई बोलत होते.
ते म्हणाले की, सुप्रीम कोर्टाचे न्यायवृंद (कॉलेजियम) न्यायाधीशपदासाठी कोणत्याही विशेष नावाची शिफारस करण्याचे आदेश देऊ शकत नाही. सुप्रीम कोर्ट व हायकोर्ट या दोन्ही संवैधानिक संस्था आहेत. दोघेही एकमेकांपेक्षा श्रेष्ठ नाहीत, असे ते म्हणाले.
या कार्यक्रमात सुप्रीम कोर्टाच्या बार असोसिएशनचे अध्यक्ष विकास सिंह यांनी सुप्रीम कोर्टाच्या कॉलेजियमला आग्रह केला की, हायकोर्टाच्या न्यायाधीशपदासाठी सुप्रीम कोर्टातील वकिलांच्या नावाचा विचार करावा.
त्यावर सरन्यायाधीश गवई म्हणाले की, सुप्रीम कोर्टाचे न्यायवृंद हायकोर्टाच्या कॉलेजियमला नावाच्या शिफारसीचे आदेश देऊ शकत नाही. सुप्रीम कोर्ट हे हायकोर्टापेक्षा श्रेष्ठ नाही. आम्ही केवळ हायकोर्टाच्या कॉलेजियमच्या नावाची शिफारस करतो. तसेच त्यांच्या नावावर विचार करण्याची विनंती करतो. जेव्हा उमेदवार नियुक्तीसाठी योग्य असल्याचे कळताच आम्हाला समाधान लाभते. त्यानंतर ती नावे सुप्रीम कोर्टाकडे येतात, असे त्यांनी सांगितले.
सरन्यायाधीश भूषण गवई म्हणाले की, माजी सरन्यायाधीश संजीव खन्ना यांनी न्यायाधीशांची निवड करण्यापूर्वी एक चांगली प्रथा काढली होती. न्यायाधीशपदाच्या उमेदवारांसोबत चर्चा करायला सुरुवात केली. १० ते ३० मिनिटांच्या चर्चेत आम्हाला ते संबंधित उमेदवार समाजाला किती योगदान देऊ शकतील, हे कळत होते.
