पंढरपूर : महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या पडद्यामागे प्रचंड घडामोडी घडत आहेत. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक पक्ष कामाला लागले आहेत. त्यामुळे विविध पक्षांमध्ये मोठमोठे पक्षप्रवेश होताना दिसत आहेत. सोलापुरात माजी मंत्री तानाजी सावंत यांचे बंधू तथा शिवसेनेचे माजी दिल्हा संपर्क प्रमुख शिवाजीराव सावंत हे पक्षात नाराज असल्याची चर्चा आहे. शिवाजीराव सावंत यांनी नाराजीतून आपल्या पदाचा राजीनामा देखील दिला. पण तरीही पक्षातून कुणीही आपल्याला विचारत नाही, अशी सल शिवाजीराव सावंत यांनी बोलून दाखवली आहे. असं असतानाच आता शिवाजीराव सावंत यांना राजकीय मार्ग मिळताना दिसत आहे. कारण शिवाजीराव सावंत यांना थेट भाजपात प्रवेश मिळणार असल्याची शक्यता आहे.
शिवाजीराव सावंत यांची सोलापुरात नुकतीच पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्यासोबत बंद दाराआड चर्चा झाल्याची माहिती समोर आली होती. या बैठकीनंतर शिवाजीराव सावंत यांनीसुद्धा आता आपली नाराजी जाहीरपणे मांडत भाजपमध्ये जाण्याबाबत सूचक प्रतिक्रिया दिली आहे. त्यामुळे सोलापुरात भाजपचं एकप्रकारे ऑपरेशन लोटसच यशस्वी होत असल्याची चर्चा आहे. दरम्यान, शिवाजीराव सावंत यांनी महत्त्वाची प्रतिक्रिया दिली आहे.
शिवाजीराव सावंत काय म्हणाले?
” शिवसेना पक्षाचे एकनिष्ठ काम करीत आलो. नव्याने पक्षात आलेल्या मंडळींनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि पक्षाच्या वरिष्ठ मंडळींना चुकीची माहिती देऊन कुरघोडीचे राजकारण सुरू केले. मला न विचारता माढा तालुक्यातच तालुकाप्रमुख नेमला. या प्रकाराची आम्ही स्वतः पक्षाकडे तक्रार केली. मात्र हालचाली शून्य झाल्या. पदाचा राजीनामा देऊन 15 दिवस लोटले. पण साधी विचारणा केली नाही. स्वाभिमान गहाण ठेवून पक्षात राहणं काही अर्थच नाही. कार्यकर्त्यांच्या भावनांचा विचार घेऊन दोन दिवसात राजकीय निर्णय घोषित करणार”, अशी प्रतिक्रिया शिवाजीराव सावंत यांनी दिली.
” सोलापूर जिल्ह्यात सुरू असलेल्या विश्वासात न घेण्याच्या वृत्तीची पक्षांच्या वरिष्ठाकडे दोन वेळा भेट घेऊन तक्रार केली. मात्र कसलीही दखल न घेता माझी अवहेलना केली. चार पक्ष बदलून सत्तेत आलेला माणूस पदे वाटप करत असेल तर हे पक्षाच्या कोणत्या चौकटीत बसते? असा सवाल करत शिवाजीराव सावंत यांनी नाव न घेता कोकाटे यांच्यावर टीका केली. महेश साठे यांना पंढरपुरात दहा लोक ओळखत नाही, असा टोमणा देखील शिवाजी सावंत यांनी लगावला. आता वेळ आली आहे राजकीय भूमिका जाहीर करण्याची”, असंही ते यावेळी म्हणाले.
भाजपमध्ये प्रवेश करणार?
“शिवसेना पक्षाच्या वरिष्ठ मंडळींनी नव्याने पक्षात आलेल्या मंडळीवर जोरदार निशाणा साधताना, ज्या पक्षात 25 वर्ष होऊन अधिक काळ घालवला, पण आपल्याला विश्वासात घेतले जात नसल्याने तर त्या पक्षात थांबायची गरज नाही. आता पक्षातून बाहेर पडण्याची वेळ आली असून भाजप पक्षात खऱ्या अर्थाने जावे लागेल”, असे मत शिवसेनेचे संजय टोपणे, रवीना राठोड, मंगलताई कोल्हे, नवनाथ भजनावळे, मुन्ना साठे आदींनी व्यक्त केले.
