पंढरपूर – राज्यभर धो-धो पाऊस पडत असला तरी पंढरपूर तालुक्यात मात्र या हंगामात अपेक्षित पाऊस झाला नाही. असे असतानाही नीरा व भीमा खोऱ्यातील सर्व साखळी धरणे ओव्हरफ्लो झाली आहेत. त्यामुळे उजनीतून ४० हजार, तर वीर धरणातून ४२ हजार क्युसेकपेक्षा जास्त विसर्ग नदीपात्रात सोडण्यात येत असल्यामुळे भीमा नदीत ८२ हजारांपेक्षा जास्त क्युसेकने पाणी वाहणार आहे. त्यामुळे पंढरपूर शहरासह नदीकाठच्या गावांवर पुराची टांगती तलवार कायम आहे. यावर्षी तालुक्यात पाऊस नसतानाही चौथ्यांदा पुराचा फटका बसण्याची चिन्हे आहेत.गेल्या काही दिवसांपासून नीरा व भीमा खोऱ्यात मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यापूर्वीच जवळपास सर्वच धरणे ९० ते १०० टक्क्यांवर भरलेली होती. मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पावसामुळे धरणांची पाणीपातळी पुन्हा वाढत असल्यामुळे वीर धरणातून ४२ हजार क्युसेकपेक्षा जास्त, तर उजनी धरणातून ४० हजार क्युसेकचा विसर्ग नदीपात्रात सोडण्यात येत आहे. या दोन्ही धरणातील पाणी नीरा नरसिंहपूर संगमापासून भीमा नदीमध्ये एकत्रित वाहत असल्यामुळे पंढरपूरला ८२ हजार क्युसेकपेक्षा जास्त पाणी येणार आहे. त्यामुळे भीमा नदीकाठच्या परिसराला पुन्हा पुराचा तडाखा बसणार आहे.
आतापर्यंत तीनवेळा पूर
हंगामात यापूर्वी तीनवेळा भीमा नदीला पूर आला आहे. प्रत्येक वेळी नदीकाठच्या परिसरातील शेतीसह चंद्रभागा वाळवंटातील मंदिरे पाण्यात गेल्याचे चित्र होते. आता चौथ्यांदा पुन्हा मंदिरासह ऊसशेती पाण्यात जाणार आहे
बंधारे पाण्याखाली जाणार
५० हजार क्युसेकपेक्षा जास्त विसर्ग नदीत आल्यास कोल्हापूर पद्धतीचे बंधारे, जुना दगडी पूल पाण्याखाली जातो. आता जवळपास ८२ हजार क्युसेकपेक्षा जास्त पाण्याचा विसर्ग नदीपात्रात येत असल्याने बुधवारी संध्याकाळी किंवा गुरुवारी सकाळी भीमा नदीवरील आठ कोल्हापूर पद्धतीचे बंधारे, पंढरपूरचा जुना दगडी पूल व वाळवंटातील मंदिरे पाण्याखाली जाणार आहेत. त्यामुळे अनेक ठिकाणची वाहतूक बंद करण्यात येणार आहे.
