मुंबई – मुंबईतील बेस्ट कामगार पतपेढी निवडणुकीच्या निकालाने ठाकरे बंधूंना मोठा धक्का बसला आहे. ठाकरे बंधूंना या निवडणुकीत भोपळाही फोडता आला नाही. या निवडणुकीत कामगार नेते शशांक राव यांच्या पॅनेलचे १४ उमेदवार निवडून आले आहेत, तर भाजप आमदार प्रसाद लाड यांच्या श्रमिक उत्कर्ष सभाप्रणित सहकार समृद्धी पॅनेलचे ७ उमेदवार विजयी झाले आहेत. यामुळे ठाकरेंच्या बेस्टमधील ९ वर्षांच्या सत्तेला सुरुंग लागला आहे.
मुंबई महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे बंधू बेस्टच्या पतपेढी निवडणुकीत एकत्र आले होते. त्यामुळे या निवडणुकीला अधिक महत्त्व प्राप्त झाले होते. महापालिकेच्या निवडणुकीपूर्वी ठाकरे बंधूंसाठी ही ‘लिटमस टेस्ट’ होती. अशी सर्वत्र चर्चा असतानाच या टेस्टमध्ये ठाकरे बंधूच्या अतिआत्मविश्वासाचा फज्जा उडाला आहे. ठाकरे बंधूंच्या उत्कर्ष पॅनेलला या निवडणुकीत साधे खातेही उघडता आले नाही.
बेस्टच्या या पतपेढीच्या निवडणुकीसाठी १८ ऑगस्ट रोजी मतदान झाले होते. यानंतर १९ ऑगस्ट रोजी निकाल जाहीर होणार होते. मात्र, १९ ऑगस्ट रोजी मुंबईत मुसळधार पाऊस पडल्यामुळे मतमोजणीस दुपारनंतर सुरुवात करण्यात आली. त्यामुळे मंगळवारी रात्री उशिरा निकाल जाहीर करण्यात आला. या निवडणुकीदरम्यान चर्चेत नसलेले कामगार नेते शशांक राव यांच्या पॅनेलने कमाल करुन दाखवली. यामध्ये शशांक राव यांच्या पॅनलमधील २१ उमेदवारांपैकी सर्वाधिक १४ उमेदवार विजयी झाले आहेत. तर आमदार प्रसाद लाड, नितेश राणे यांची समर्थ बेस्ट कामगार संघटना, तसेच शिंदेंच्या शिवसेनेचे किरण पावसकर यांची राष्ट्रीय कर्मचारी सेना यांच्या श्रमिक उत्कर्ष सभाप्रणित सहकार समृद्धी पॅनेलचे ७ उमेदवार विजयी झाले आहेत.
सगळ्यांचे तोंड पावसात भिजले – आशिष शेलार
कामगारांनी आम्हाला शुभसंकेत दिला आणि ‘पतपेढी’साठी धडपडणाऱ्यांच्या हाती भोपळा दिला. बॅलेट पेपरवर झालेल्या या लढाईत मुंबईकरांनी आमची बाजू घेतली. तथाकथित विश्लेषक, मतचोरीचे गाणे गाणारे तज्ज्ञ आणि निर्भय वक्ते सगळ्यांचे तोंड पावसात भिजले.
ठाकरेंनी राजकारण केल्याने जनतेने नाकारले – फडणवीस
ठाकरें बंधू एकत्र, ठाकरे ब्रँड निवडून येणार, अशाप्रकारे त्यांनी पतपेढी निवडणुकीचे राजकारण केले. ते लोकांना आवडलेले दिसत नाही. त्यामुळे त्यांना एकही जागा मिळालेली नाही. या निवडणुकीत तरी त्यांना लोकांनी नाकारल्याचे चित्र आहे, अशी टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी पुण्यात माध्यमांशी बोलताना केली.
बेस्ट पतपेढीचा अंतिम निकाल
-शशांक राव पॅनल – १४
-प्रसाद लाडप्रणित सहकार समृद्धी पॅनल – ७
– मनसे – शिवसेनचे उत्कर्ष पॅनल – ०
