टेंभुर्णी – भीमा खोऱ्यातील पाऊस थांबल्याने उजनी धरणात येणारी आवक थांबली असून, दौंड येथील विसर्गात मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. दौंड येथून सायंकाळी ४३ हजार क्यूसेक विसर्ग उजनी मिसळत होता, तर दौंड येथील विसर्ग घटल्याने उजनीतून भीमा नदीत सोडण्यात येणारा विसर्गदेखील ६० हजार क्यूसेक करण्यात आला आहे. यामुळे पंढरपूर शहरासह अनेक भीमा नदीकाठचा गावांना दिलासा मिळाला आहे.भीमा नदीला महापूर आल्याने नदीकठच्या अनेक गावांत पाणी शिरले होते. यामुळे शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. अनेक छोटे-मोठे पूल पाण्याखाली गेले. वाहतुकीवर परिणाम झाला. शनिवारपासून भीमा नदीची पाणीपातळी आणखी घटत जाणार आहे. यामुळे दिलासा मिळणार आहे.दौंड येथील विसर्ग गुरुवारी सकाळपर्यंत १ लाख ७७ हजार क्यूसेकपर्यंत गेला होता. उजनी पूर्णक्षमतेने भरली असल्याने उजनीतून १ लाख ५० हजार क्यूसेकपर्यंत वाढवण्यात आला होता. पुणे जिल्ह्यातील पावसाने विश्रांती घेतल्याने शुक्रवारी सकाळ पासून दौंड व उजनीतील विसर्गात घट होत गेली. भीमा नदीकाठचा गावांना दिलासा मिळाला आहे.
