पंढरपूर – भीमा नदीला आलेल्या पुरामुळे तालुक्यातील बंधारे पाण्याखाली असताना शुक्रवारी रात्री उशिरा मंगळवेढा मार्गावरील गोपाळपूर पुलावर पाणी आल्याने तो वाहतुकीसाठी बंद करण्यात आला. पुराच्या पाण्यामुळे कौठाळी, नांदोरे-नेवरे पूल, जुन्या पालखी मार्गावरील वाहतूक दोन दिवसांपासून पूर्ण बंद आहे. पुराचे पाणी नदी काठावरील गावात अन् शेतात शिरल्यामुळे काही शेतकरी, नागरिकांनी रात्र जागून काढली.पंढरपूर शहरातील व्यासनारायण झोपडपट्टी, अंबाबाई पटांगण, परिसरात पाणी शिरल्यामुळे एक हजारपेक्षा जास्त लोकांना स्थलांतरित व्हावे लागले आहे. घरांसह शेतीचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे. मात्र, पुराचे पाणी आता हळू हळू ओसरू लागले आहे. सततच्या पावसामुळे वीर व उजनी धरण ओव्हरफ्लो झाल्यामुळे भीमा नदीत गेल्या चारपासून जवळपास पावणे दोन लाख क्युसेकपेक्षा जास्त विसर्ग सुरू होता. त्याचा फटका पंढरपूर शहरासह तालुक्यातील नदीकाठच्या शेतकऱ्यांना बसला आहे. उसासह केळी, डाळिंब, द्राक्ष आदी फळबागांत पाणी शिरल्यामुळे नुकसान होत आहे. उसाबरोबर केली व तर पिके देखील पाण्याखाली गेली आहेत. पाण्यात बुडालेल्या पिकांसह भाजीपाल्याची नासाडी होत आहे.
नदीपात्राच्या बाहेर किमान दहा ते पंधरा फूट पाणी उभारले आहे. नदीपात्रापासून एक ते पाच किमीपर्यंत पाणी शेतात शिरले आहे. देगाव व अजनसोंड, येथील ओढ्याद्वारे पाच किमीपर्यंत पाणी शेतात शिरले आहे. या पाण्याने पंढरपूर तिर्हे मार्ग सोलापूर रस्ता बंद केला आहे. नदीकाठावरील गावातील, शेत शिवारातील अनेक कुटुंबांनी स्थलांतर केले असून आपला संसार गुरा-ढोरासह रस्त्यावर मांडला आहे.अजनसोंड ते मुंढेवाडी, खरसोळी ते आंबे, तसेच कौठाळी ते गुरसाळे, पटवर्धन कुरोली ते आव्हे अशा अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. पिकांसह स्टार्टर, मोटर, केबल, पाईप, पेट्या आदी साहित्य पुराच्या पाण्यात वाहून गेल्याचे प्रकार समोर येत आहेत. बैलपोळा सण देखील शेतकऱ्यांना घरापासून दूर अंतरावर साजरा करावा लागला आहे.
अनेक मार्ग बंद, नागरिकांना फटका…
पुराच्या पाण्याने पंढरपूर ते जुना अकलूज रोड बंद झाला आहे. तसेच पंढरपूर-मंगळवेढा रोडवरील गोपाळपूर येथील पुलावर पाणी असल्याने रस्ता बंद आहे. कोठाळी पूल, नांदोरे नेवरे पूल, तर पंढरपूर तिहें मार्गे रस्त्यावर देगाव-अजनसोंड येथे रस्त्यावर पाणी आल्याने रस्ता वाहतुकीसाठी बंद आहेत.
नदीला पूर आल्याने शेती पिकात पाणी शिरले आहे. मात्र, पूर ओसरल्यानंतरच नेमके किती पिकांचे नुकसान झाले आहे, याचा अंदाज येईल. वरिष्ठांच्या आदेशानुसार पूरपरिस्थिती संपल्यानंतरच पंचनामे करण्यांत येतील.
सचिन लंगुटे तहसीलदार, पंढरपूर
