पंढरपूर – उजनी व वीर धरणांतून करण्यात येणारा पावणे दोन लाखांचा विसर्ग कमी करून तो ८५ हजारांवर करण्यात आला आहे. त्यामुळे भीमा नदीकाठच्या गावांना तसेच पंढरपूर शहराला निर्माण होणारा धोका टळला आहे. तरीदेखील पंढरपूर येथे दीड लाखाहून अधिकचा विसर्ग सुरू आहे. त्यामुळे पंढरपूर येथील जुना अकलूज रोड, देगाव येथील पंढरपूर तिर्हेमार्गे सोलापूर रस्ता, तसेच पंढरपूर-मंगळवेढा रोडवरील गोपाळपूर येथील रस्त्यावरील पाणी साचून राहणार असल्याने हे रस्ते खुले होण्यासाठी शनिवारी दुपारची वाट पाहावी लागणार आहे.तर भीमा नदीवरील कोल्हापूर पद्धतीचे बंधारे उघडे होण्यासाठी रविवारची वाट पाहावी लागणार आहे. उजनी धरणातून विसर्ग कमी केल्यामुळे धोक्याच्या पातळीवरून वाहणारी भीमा नदी इशारा पातळीकडे जाणार आहे.पंढरपूर येथे गुरुवारी सायंकाळी १ लाख ७० हजार क्युसेकचा विसर्ग सुरू होता. तो कायम आहे. त्यामुळे पंढरपूर येथील व्यासनारायण झोपडपट्टी, अंबाबाई पटांगण येथील कुटुंबांना स्थलांतरित करण्यात आले आहे. त्यांना अजून रविवारपर्यंत घरी जाण्यासाठी वाट पाहावी लागणार आहे.
उजनी व वीर धरण परिक्षेत्रात पावसाचे प्रमाण कमी झाले आहे. त्यामुळे धरणात येणारा विसर्ग कमी झाला आहे. त्यामुळे यामुळे धरणातून करण्यात येणारा विसर्गदेखील कमी करण्यात येत आहे. शुक्रवारी दुपारी ३:३० वाजता उजनीतून ८० हजारांचा तर वीर धरणातून ६५९५ क्युसेकचा विसर्ग करण्यात येत आहे.
प्रशासनाकडून ५०० लोक स्थलांतरित
पंढरपूर शहरातील व्यासनारायण झोपडपट्टी व अंबाबाई पटांगण येथील १२७ कुटुंबांतील ४५५ लोकांना स्थलांतरित करण्यात आले आहे. ग्रामीण भागातील पिराची कुरोली, सांगावी, देगाव येथील ७कुटुंबांतील ४५ असे मिळून एकूण १३४ कुटुंबांतील ५०० लोकांना स्थलांतरित करण्यात आले आहे.
