मूर्तिमंत चैतन्य, उत्साहाचे प्रतीक असलेल्या विघ्नहर्त्या गणरायाची गणेश चतुर्थीच्या दिवशी मुंबईसह राज्यात घरोघरी प्रतिष्ठापना करण्यात आली. त्याचबरोबर विविध सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या भव्य गणरायांची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे. गणरायाच्या आगमनामुळे सर्वत्र भक्तीभावाचे व उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. तसेच संपूर्ण राज्य ‘गणपती बाप्पा मोरया’ च्या गजरात न्हाऊन निघाले आहे.गणपतीची घरात प्रतिष्ठाना होणार असल्याचे घराघरात पहाटेपासून कामाला सुरुवात झाली होती. सकाळी बाप्पाची मूर्ती आणायला जाताना भाविक दिसत होते. वाजत-गाजत ढोल-ताशांच्या गजरात भाविक घरी मूर्ती आणत होते. रस्त्यारस्त्यात ‘गणपती बाप्पा मोरया’चा गजर सुरू होता. घराबाहेर रांगोळी घातली होती. तसेच ब्रह्मवृंदाकडून गणपतीची प्रतिष्ठापना केली जात होती. त्यानंतर आरत्या म्हटल्या जात होत्या. बाप्पाला नैवैद्यासाठी वरण, भात, मोदक, पुरणपोळी, बासुंदी आदी मिठ्ठान्न पदार्थ होते.पुण्यातील दगडूशेठ हलवाई गणपती, ठाण्याचा कोपिनेश्वर गणपती या भागांतही उत्साहाचे वातावरण होते. राज्यभरातील पोलीस प्रशासनाने मोठ्या संख्येने सुरक्षा बंदोबस्त तैनात केला आहे. वाहतूक व्यवस्थापनासाठी विशेष नियोजन करण्यात आले आहे.
