मराठा आरक्षणसाठी (Maratha Reservation) मनोज जरांगे पाटील (Manoj Jarane Patil) यांनी मुंबईतील आझाद मैदानात आंदोलन सुरु केलं आहे. आज सकाळी मोठं शक्तिप्रदर्शन करत मनोज जरांगेंनी मुंबई गाठली. मनोज जरांगेंसह मराठा आंदोलकांच्या हजारो गाड्यांचा ताफा मुंबई पोहोचला. यावेळी मागण्यांची अंमलबजावणी होईपर्यंत मुंबई सोडणार नाही, गोळ्या घातल्या तरी मागे हटणार नाही. डोक्यावर गुलाल पडल्याशिवाय आता इथून उठायचं नाही, असं मनोज जरांगे म्हणाले. सरकारने आता चर्चेसाठी यावे, असंही मनोज जरांगेंनी सांगितले. यानंतर राज्य शासनाचे शिष्टमंडळ आज मनोज जरांगे पाटील यांची भेट घेण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. संध्याकाळी राज्य सरकारचे प्रतिनिधी आझाद मैदान येथे जरांगे यांची आझाद मैदानात भेट घेऊन चर्चा करणार असल्याचं सांगण्यात येत आहे.
शासनाचं शिष्टमंडळ मनोज जरांगेंना भेटण्याची शक्यता-
मनोज जरांगे यांनी आज सकाळी 10 वाजल्यापासून मुंबईतील आझाद मैदानात उपोषणास सुरुवात केली आहे. उपोषणामुळे दक्षिण मुंबईत मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे. या भागात गणपती भक्तांचीसुद्धा मोठी गर्दी असते. त्यामुळे मनोज जरांगे यांच्या उपोषणावर लवकर तोडगा काढण्याचा सरकारचा प्रयत्न असणार आहे. त्यामुळे तातडीने आज शासनाचं शिष्टमंडळ मनोज जरांगे यांना भेटण्याची शक्यता आहे. राज्य सरकारच्या या शिष्टमंडळात नेमकं कोण कोण असणार, याबाबतही माहिती समोर आलेली नाही.
आझाद मैदानात पोहोचताच मनोज जरांगे काय काय म्हणाले?
– कोणीही जाळपोळ, दगडफेक करायची नाही, आंदोलनाला बट्टा लावायचा नाही, मी मरण पत्करायला तयार आहे, पण आता मागे हटायचं नाही
– मराठ्यांना विजय मिळवून दिल्याशिवाय, डोक्यावर गुलाल टाल्याशिवाय इथून हालायचं नाही
– सरकारने आपल्याला सहकार्य केलंय, आता आपणही सरकारला सहकार्य करावं. समाजाचं नाव खाली जाईल, असं कुणी वागू नका.
– दारु पिऊन धिंगाणा घालू नका, माझ्या समाजाला खाली मान घालावी लागेल असं वागू नका.
– मला गोळ्या घातल्या तरी चालतील पण आता समाजाच्या मागण्या पूर्ण केल्याशिवाय मागे हटणार नाही
– कोण काय सांगतंय, कोण राजकीय पोळी भाजतंय, त्यासाठी कोणी आपल्या आंदोलनाचा वापर करतंय का हे गांभीर्याने पाहा
– दोन तासात मुंबई मोकळी करुन द्या, पोलिसांना सहकार्य करा, एकही पोलीस नाराज होणार नाही याची काळजी घ्या..
मनोज जरांगे पाटील यांच्या नेमक्या मागण्या कोणत्या? (What are the exact demands of Manoj Jarange Patil?)
1. मराठा कुणबी एक आहेत. याची अंमलबजावणी झाली पाहिजे,
2. हैदराबाद गॅझेटियर लागू करा…सातारा, बाँबे गॅझेटियर लागू करावे.
3. ज्याची कुणबी नोंद सापडली आहे त्याचे सगे सोयरे घ्या…सगे सोयरे पोट जात म्हणून घ्या.
4. मराठा आंदोलकांवरील सरसकट गुन्हे मागे घ्या.
5. आमचं कायद्यात बसणारे आरक्षण द्या.
