मराठा समाजाला ओबीसीतून (Maratha Reservation) आरक्षण मिळावे, या मागणीसाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी मुंबईच्या आझाद मैदानावर आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे. तर दुसरीकडे ओबीसी समाजातून मनोज जरांगे यांच्या मागणी विरोध केला जात आहे. आता ओबीसी नेते लक्ष्मण हाके (Laxman Hake) यांनी यावरून एक गंभीर आरोप केलाय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे (Devendra Fadnavis) सरकार उलथवण्यासाठी विरोधकांसह अजित पवारांचे (Ajit Pawar) आमदारही सामील असल्याचे त्यांनी म्हटले आहे. लक्ष्मण हाके यांनी पुणे येथे पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले की, जरांगेंनी मुंबईकडे निघतानाच हा राजकीय अजेंडा असल्याची स्क्रिप्ट फोडली आहे. राजकीय अजेंडा कसा तर ते म्हणाले मी सरकार उलथवून लावणार आहे. देवेंद्र फडणवीस यांचं सरकार उलथवून लावण्यासाठी आम्ही आजपर्यंत म्हणायचो की, विरोधी पक्ष त्यामध्ये सामील असेल. पण, आता मी जबाबदारीने सांगत आहे की, सरकार उलथवण्यासाठी जसे विरोधी पक्षाचे आमदार, खासदार त्यामध्ये सामील आहेत, तसेच अजितदादा पवार यांचे देखील आमदार, खासदार सामील आहेत, असा मोठा आरोप त्यांनी यावेळी केला आहे.
सरकार बदलण्याचा प्रयत्न
लक्ष्मण हाके पुढे म्हणाले की, जरांगे नावाच्या चेहऱ्याआडून महाराष्ट्रामध्ये आमदार, खासदार सरकार अस्वस्थ करण्याचा प्रयत्न करत आहेत. सरकार बदलण्याचा प्रयत्न करत आहेत. आरक्षण हा विषय नाहीच. मराठा बांधवांना माझी हात जोडून विनंती आहे की, जरांगेंची ही मागणी मान्य झाली तर महाराष्ट्रातल्या ओबीसींचे आरक्षण संपलेले असेल. कारण शासनकर्त्या जमातीपासून, राज्यकर्त्या जमातीपासून संरक्षण मिळण्यासाठी ओबीसी आरक्षण आहे. ज्यांच्यापासून संरक्षण पाहिजे तेच सगळे लांडगे ओबीसीच्या कळपामध्ये घुसले तर या मेंढरांचे काय होईल? असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला.
रवींद्र चव्हाण यांच्यावर लक्ष्मण हाकेंची टीका
नांदेडचे खासदार रवींद्र चव्हाण यांनी जरांगे पाटलांना लेटरहेडवर पाठिंबा दिला आहे. जरांगे पाटलांना तुम्ही लेटर पाठिंबा देत आहे तर ओबीसी आरक्षणाबाबत तुम्ही तुमची भूमिका जाहीर करा. ओबीसीच्या आरक्षण तुम्हाला संपवायचे आहे का? तुमच्या स्पर्धेत इथला ओबीसी टिकेल का? असे म्हणत लक्ष्मण हाके यांनी रवींद्र चव्हाण यांच्यावर हल्लाबोल केला.
लक्ष्मण हाकेंना नोटीस, अन् जरांगेंना रेड कार्पेट
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आमची विनंती आहे की, कायद्यासमोर सगळे समान आहेत. लक्ष्मण हाके कुठल्याही प्रतिबंधाचा अध्यादेश नसताना गेवराईत गेला होता. मात्र, लक्ष्मण हाकेंना नोटीस बजावण्यात आली. आणि जरांगेंना मात्र रेड कार्पेट देण्यात आले. गुन्हे दाखल होताना सुद्धा दुजाभाव या महाराष्ट्रात होत असल्याचा आरोप देखील लक्ष्मण हाके यांनी केलाय.
