पंढरपूर – सध्या उजनी धरणातून सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे चंद्रभागा नदी दुथडी भरून वाहत आहे. यामुळे गणपती विसर्जनादरम्यान गणेशभक्तांची नदीपात्रात कोणतीही जीवितहानी होऊ नये, यासाठी पंढरपूर नगरपरिषदेकडून शहरातील १४ विविध ठिकाणी गणेशमूर्ती संकलन केंद्र सुरू करणार असल्याचे मुख्याधिकारी डॉ. महेश रोकडे यांनी सांगितले.गणेश विसर्जनासाठी नगरपालिका प्रशासनाच्या वतीने तयारी पूर्ण केली असून, विसर्जन ठिकाणी पुरेशी प्रकाश व्यवस्था, आवश्यक ठिकाणी बॅरेकेटिंग करण्यात आले आहे. सद्यस्थितीत उजनी धरणातून नदीपात्रात पाणी सोडण्यात आले. नदीपात्रात गणेशमूर्ती विसर्जन करताना दक्षता घ्यावी. विसर्जनाच्या वेळी लहान मुलांना नदीपात्रापासून दूर ठेवावे
गणेशमूर्ती या ठिकाणी जमा कराव्यात अर्बन बँक प्रशासकीय इमारतीसमोर, भोसले चौक गणेश मंदिरासमोर, शेटे पेट्रोलपंपासमोर, कॉलेज चौक बस स्टॉपजवळ, ठाकरे चौक, सावरकर चौक गजानन मेडिकल समोर, शिवतीर्थ शिवाजी महाराज चौक, महात्मा फुले पुतळ्यासमोर, महाद्वार चौक पोलिस चौकीजवळ, मुक्ताबाई मठ, अंबाबाई पटांगण, अहिल्या पुलाजवळ टेभुर्णी रस्ता, यमाई तलाव गेटजवळ टाकळी रोड, तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाजवळ या ठिकाणी घरगुतीसह सार्वजनिक गणेश मंडळाच्या मूर्ती गोळा करण्यासाठी संकलन केंद्र उभारण्यात आले आहेत.
प्रशासन दक्ष..
पावसामुळे घाटावरील पायऱ्या निसरड्या होण्याची शक्यता असल्याने विसर्जनासाठी प्रशासनाने निश्चित केलेल्या जागेवरच विसर्जन करावे, असे आवाहनही मुख्याधिकारी रोकडे यांनी केले आहे.
घरगुतीसह सार्वजनिक मंडळाच्या मूर्ती गोळा करण्यासाठी मूर्ती संकलन केंद्राची उभारणी केली आहे. निर्माल्य गोळा करण्यासाठी फिरत्या वाहनांची व संकलन केंद्रावर व्यवस्था करण्यात आली आहे. यासाठी नगरपालिकेच्या ५६ कर्मचारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
महेश रोकडे, मुख्याधिकारी, पंढरपूर न.प.
