मुंबई – मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर आंदोलनाला बसलेल्या मनोज जरांगे पाटील यांनी आरक्षण मिळाल्यानंतरच मुंबई सोडणार, असा ठाम पवित्रा घेतला आहे. शनिवारी मराठा आंदोलक आणि राज्य सरकारची बाजू मांडणाऱ्या शिंदे समिती यांच्यातील बोलणी फिस्कटल्यानंतर रविवारी आंदोलनाच्या तिसऱ्या दिवशी सरकारकडून कुणीही चर्चेसाठी आले नाही. त्यामुळे जरांगे पाटलांनी सरकारला इशारा दिला असून सोमवारपासून मी पाण्याचा एकही थेंब घेणार नाही, अशी घोषणा केली आहे. त्यामुळे आजपासून आंदोलनाची धग आणखीन वाढली जाणार आहे.“सरकार मागण्या मान्य करत नाही, हे आमच्या लक्षात येत आहे. त्यामुळे सोमवारपासून मी पाणीसुद्धा बंद करणार आणि कडक उपोषण सुरू करणार. तसेच मराठा आंदोलकांनी कुणावरही दगडफेक करू नये. मराठा समाजाच्या एकाही पोराने दगडफेक करायची नाही, समाजाला मान खाली घालावी लागेल, असे एकही पाऊल कोणी उचलायचे नाही. सगळ्यांनी शांत राहायचे. त्यांना आपल्यावर कितीही अन्याय, अत्याचार करू द्या. मला तुमच्याकडून शांतता पाहिजे. मी तुम्हाला आरक्षण देणार, त्याशिवाय मुंबई सोडणार नाही. अन्नछत्र आणि रेनकोटच्या नावाने कुणी पैसे उकळत असेल तर तसे करू नका.” असे जरांगे पाटील यांनी आंदोलकांना खडसावले.
सुप्रिया सुळे यांच्या गाडीवर हल्ला केल्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आंदोलकांना झापले. “सन्मान दिला नाही तर नेते आंदोलनस्थळी यायला घाबरतील. सन्मानाने येऊ द्या आणि सन्मानाने पाठवा, ही जबाबदारी तुमच्यावर आहे. इथून एकतर विजयी यात्रा निघेल नाहीतर माझी अंत्ययात्रा निघेल,” असेही जरांगे म्हणाले.मंत्रिमंडळाच्या उपसमितीच्या बैठकीवर जरांगे म्हणाले की, “सुप्रीम कोर्टाचा सरसकटला विरोध असण्याचे कारण नाही. पण कोर्टात अडचण असेल तर मराठा कुणबी ही उपजात आहे, असे करा सरसकट म्हणू नका. २०१२ च्या कायद्यानुसार मराठा आणि कुणबी पोटजात म्हणून घ्या, सरसकट म्हणायची गरज नाही. सरकारला आता एकही कागदपत्र देणार नाही. कारण सरकारने १३ महिन्यांपूर्वी हैदराबाद गॅझेटकडून कागदपत्रे घेतले आहे. सातारा गॅझेट आहे. तसेच मराठवाड्यातला मराठा हा कुणबी आहे हे सिद्ध झाले आहे. राज्य मागासवर्ग आयोगाकडून ते घेणे गरजेचे आहे. आम्हाला ओबीसी आरक्षणात जाण्यापासून कोणीच थांबवू शकत नाही. आम्ही ओबीसीमध्ये जाणार म्हणजे जाणार.”दरम्यान, गणपतीच्या दर्शनासाठी आपल्या दरे गावी गेलेले उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे तातडीने मुंबईला रवाना झाले आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीसुद्धा मुंबईकडे कूच केली आहे.
