सोलापूर- स्टार एअर लाइन्स कंपनीकडून लवकरच सोलापूर-मुंबई विमानप्रवासाची तिकीट विक्री सुरू होईल. विमानसेवेसोबत बससेवा गरजेची आहे. बससेवेच्या कामाचा नियमित आढावा घेण्यात येईल, असे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी रविवारी सांगितले.पालकमंत्र्यांनी रविवारी सायंकाळी ‘लोकमत’ला सदिच्छा भेट दिली. कार्यकारी संपादक मिलिंद कुलकर्णी, सहायक सरव्यवस्थापक संतोष भोगशेट्टी यांनी त्यांचे स्वागत केले.पालकमंत्री गोरे म्हणाले, सोलापूर गोवा विमानसेवेला प्रतिसाद मिळत आहे.मुंबई विमानसेवाही लवकरच सुरू होईल. एकदा सेवा सुरू झाली की ती बंद पडू नये म्हणून ‘गॅप फंडिंग’चा विषय मंजूर झाला. गणेशोत्सवाच्या काळातच ही सेवा सुरू व्हावी, यासाठी आमचा प्रयत्न सुरू होता. यासाठी नुकतेच मी दिल्लीला जाऊन आलो. मुंबईसाठी लवकरच तिकीट विक्री सुरू होईल. शहरात बससेवा सुरू होईल. मात्र ही सेवा तोट्यात चालू नये यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे.पालकमंत्री म्हणून गेल्या सात महिन्यांत उजनी ते सोलापूर समांतर जलवाहिनीचे काम पूर्ण घेता आले. पाकणी जलशुद्धीकरण केंद्राच्या जागेचा विषय करून लोक मार्गी लागला. कर्णकर्णश डीजे बंद करण्याची वेळ आता आली आहे. काही लोक नियमांत बसून साउंड लावू शकतात. मात्र लोकांना त्रास होतील, असे डीजे आता वाजवू देणार नाही.यावेळी आमदार देवेंद्र कोठे, भाजपचे जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार, माजी महापौर श्रीकांचना यन्नम, माजी नगरसेवक गुरुशांत धुत्तरगावकर, भाजपचे मंडल अध्यक्ष अक्षय अंजिखाने, सागर आदी उपस्थित होते.
दिलीप मानेंच्या प्रवेशावर खुमासदार भाष्य
तुमच्या काही मित्रांना (माजी आमदार दिलीप माने) भाजपमध्ये घेण्याचा प्रयत्न सुरू आहे. राजकीय विरोध पाहता हा प्रयत्न यशस्वी होईल का, या प्रश्नावर पालकमंत्री गोरे म्हणाले, यशस्वी होणार नाही, अशी कोणतीही गोष्ट माझ्याकडून होत नाही. काही गोष्टींसाठी मुहूर्त आणि वेळ आवश्यक असतो. मुहूर्त शुभ असला की सगळ्या गोष्टी व्यवस्थित होतात. त्यामुळे हे पक्षप्रवेश योग्य वेळी होतील.
