तुळजापूर – महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी देवीच्या दर्शनासाठी दररोज लाखो भाविक महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगणा आणि आंध्र प्रदेशातून तुळजापूरात येतात. या भाविकांच्या सोयीसाठी जुने बसस्थानक पाडून तब्बल आठ कोटी रुपये खर्च करून नवे आधुनिक बस स्थानक बांधण्यात आले. काही दिवसांपूर्वीच याचे उद्घाटन राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या हस्ते मोठ्या थाटात पार पडले होते.
मात्र अवकाळी पावसानेच या ‘आधुनिकते’चा फोलपणा उघड केला आहे. बस स्थानकाच्या छतावरून ठिकठिकाणी पाणी गळत असून, बसची वाट पाहणाऱ्या प्रवाशांना व भाविकांना जागेवरच भिजत उभे राहावे लागत आहे. नव्या बस स्थानकातील ही स्थिती पाहता प्रवाशांमध्ये आणि स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.
इतक्या मोठ्या खर्चानंतरही निकृष्ट दर्जाचे बांधकाम झाल्याचे यावरून स्पष्ट होत असून, संबंधित बांधकाम विभाग आणि ठेकेदारावर कारवाईची मागणी आता जोर धरू लागली आहे. तुळजाभवानी मातेच्या सेवेसाठी आलेल्या भाविकांना या पावसात त्रास सहन करावा लागत असताना, शासनाने तातडीने दखल घेऊन दोषींवर कारवाई करावी, अशी जोरदार मागणी होत आहे.
