पंढरपूर – भाळवणी (ता. पंढरपूर) येथील सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखाना खासगी कंपनीला भाडेपट्ट्याने चालवण्यास देण्यात येणार, अशी चर्चा पंढरपूर तालुक्यात चालू आहे. शेतकऱ्यांचा असलेला साखर कारखाना भाडेपट्टयाने चालवण्यास देण्यास आमच्या विरोध आहे. तुम्हाला कारखाना चालवता येत नसेल तर राजीनामा द्या, असा इशारा सहकार शिरोमणी साखर कारखाना बचाव समितीचे अॅड. दीपक पवार यांनी दिला आहे.
सहकार शिरोमणी साखर कारखाना खासगी कंपनीला भाडेपट्ट्याने चालवण्यास देण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर सत्ताधारी काळे गटाच्या विरोधकांकडून कारखाना सहकारीच राहावा, तो खासगी कंपनीकडे जाऊ नये, यासंदर्भात सोमवारी (दि.१) वाखरी येथे बचाव समितीकडून विचार विनिमय बैठक घेण्यात आली आहे. यावेळी दीपक पवार बोलत होते. यावेळी डॉ. बी.पी. रोंगे, माजी उपसभापती विष्णू बागल, अरुण काळे व माजी संचालक, सभासद, शेतकरी, वाहतूकदार उपस्थित होते. या बैठकीत पुढील दिशा निश्चित करण्यात आली आहे. त्यानुसार बुधवारी कारखाना स्थळावर जाऊन चेअरमन कल्याणराव काळे यांना याबाबत जाब विचारण्यात येणार आहे.
कारखाना वाचविण्यासाठी सर्व प्रकारची लढाई..
सहकार शिरोमणी साखर कारखाना भाडेतत्त्वावर देणार असल्याची चर्चा ऐकायला मिळत आहे. आम्ही साखर आयुक्तांकडे चौकशी केली. ज्या कंपनीला कारखाना देण्याची चर्चा आहे. त्यांना भेटून आम्ही चर्चा केली. त्यांनीही स्पष्ट सांगितले नाही; परंतु खाजगी कंपन्यांकडून ताळेबंद-पत्रक तपासणी सुरू आहे, भाडेपट्टा करण्याच्या हालचाली सुरू आहेत. आम्ही सभासदांसमोर जाऊन कारखाना वाचवण्याचा निर्णय घेतला. कारखाना वाचवण्यासाठी सर्व प्रकारची लढाई लढणार असल्याचे माजी संचालक अॅड. दीपक पवार यांनी सांगितले.
राजकीय स्वार्थापोटी काहीही आरोप केल्यास त्यांना उत्तर देण्यास बांधील नाही. संस्था चालवणे शेतकरी सभासदांच्या हिताचे निर्णय घेण्यास आम्ही कटिबद्ध आहोत. बाकी आरोपांना योग्य वेळी उत्तर देऊ.
कल्याणराव काळे, चेअरमन, सहकार
शिरोमणी कारखाना
