मोहोळ – विविध पक्ष, संघटना आणि व्यापाऱ्यांच्या मागणीनंतर ३ सप्टेंबरपासून मोहोळ रेल्वे स्थानकावर सिद्धेश्वर एक्स्प्रेस थांबणार आहे. यामुळे मुंबईला जाणाऱ्या प्रवाशांसह व्यापाऱ्यांमध्ये आनंदाचे पसरले आहे. वातावरण याबाबतचे अधिकृत पत्र प्राप्त झाले असून, अखेर पाच वर्षांनंतर मोहोळ येथे सिद्धेश्वर एक्स्प्रेस थांबायला सुरुवात होणार आहे. कोरोनापूर्वी मोहोळमध्ये सिद्धेश्वर एक्स्प्रेस, चेन्नई मेल, सोलापूर-मिरज आणि पॅसेंजर या गाड्या थांबत होत्या. मात्र, कोरोनामध्ये गाड्या थांबणे बंद झाले. त्यानंतर सर्व गाड्यांचे थांबे सुरू झाले असताना मोहोळ येथे मात्र पूर्वी थांबणाऱ्या गाड्या अजिबात थांबत नव्हत्या. यासाठी खासदार धनंजय महाडिक, नूतन खासदार प्रणिती शिंदे, माजी नगराध्यक्ष रमेश बारसकर आदींनी दिल्ली येथे मंत्र्यांना भेटून मागणी केली होती.
डिसेंबर २०२४ मध्ये मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक धर्मराज मीना यांनी मोहोळ स्थानकाची पाहणी केली होती. त्यावेळी व्यापारी संघटना, वकील,विविध राजकीय पक्ष, प्रवासी संघटना आदींनी त्यांना भेटून गाड्यांना थांबा देण्याची आग्रही मागणी केली होती. १५ दिवसांपूर्वी थांब्याला अंतिम मंजुरी मिळाली आणि बुधवार, दि. ३ सप्टेंबरपासून जाताना आणि येताना सिद्धेश्वर एक्स्प्रेस मोहोळमध्ये थांबणार असल्याचे अधिकृत पत्र प्राप्त झाले. यामुळे मुंबई, पुणे, दौंडकडे जाणाऱ्या प्रवाशांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे. मुंबई-चेन्नई मेल, कोल्हापूर-कलबुर्गी एक्स्प्रेस, सोलापूर-पुणे हुतात्मा एक्स्प्रेस, हैदराबाद एक्स्प्रेस आणि कोणार्क एक्स्प्रेस या गाड्यांना थांबा मिळावा, या मागणीसाठी आता सर्व प्रवाशांसह विविध राजकीय पक्ष व सामाजिक संघटनांची मागणी आहे
