धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर (Omraje Nimbalkar) यांनी जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात बुधवारी झालेल्या दिशा समितीच्या बैठकीत (Disha Samiti Meeting) अधिकाऱ्यांची खरडपट्टी काढत बाप काढला. तुमच्या बापाचं राज्य आहे का? तुम्हाला वाटेल तसं काम करणार?, तुम्ही कोणासाठी काम करत आहात जनतेसाठी की खाजगी व्यक्तीसाठी? असा सवाल करत ओमराजेंनी अधिकाऱ्यांना धारेवर धरलं. संविधानापेक्षा तुम्ही मोठे झालात का? मालक आहात? मी तिथला खासदार आहे मला का विचारलं नाही? असा प्रश्नांचा भडीमार करत ओमराजेंनी बैठकीत अधिकाऱ्यांना धारेवर धरलं. खासदार ओमराजे निंबाळकर यांनी दिशा समितीच्या बैठकीत अधिकाऱ्यांची खरटपट्टी काढली. अधिकाऱ्यांचा थेट बाप काढल्याने नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.मंचावर आमदार कैलास पाटील, आमदार प्रवीण स्वामी, जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार, सीईओ डॉ. मैनाक घोष, निवासी उपजिल्हाधिकारी शोभा जाधव, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अनुप शेंगुलवार, प्रकल्प अधिकारी मेघराज पवार यांची प्रमुख उपस्थिती होती.
दिशा समितीच्या बुधवारी पार पडलेल्या बैठकीत खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर तीव्र नाराजी व्यक्त करत अधिकाऱ्यांना चांगलंच फैलावर घेतलं. बैठकीला सुरुवात होताच त्यांनी जलसंधारण विभागाचे अधिकारी महामुनी यांना उद्देशून प्रश्नांची सरबत्ती केली. मात्र, विचारलेल्या प्रश्नांना समाधानकारक उत्तरे मिळाली नाहीत, त्यामुळे राजेनिंबाळकर संतापले. “कामे दर्जेदार आणि वेळेवर करा. तुमच्याविरोधात अनेक गंभीर तक्रारी माझ्याकडे आल्या आहेत. आता तरी कारभार सुधारला नाही, तर कारवाईस तयार रहा,” असा इशारा त्यांनी दिला.
ग्रामसडक विभागालाही फटकारले
प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेतर्गत मंजूर झालेल्या 32 कामांपैकी फक्त 10 कामे पूर्ण झाली असून, उर्वरित 22 पैकी 17 कामांबाबतही त्यांनी प्रश्न उपस्थित केला. यावर अधिकाऱ्यांनी स्पष्टीकरण देताना सांगितले की, त्यातील 8 कामे पुलांची आहेत, तर 9 कामे नागरिकांच्या तक्रारींमुळे रखडली आहेत. मात्र, हे उत्तर राजेनिंबाळकरांना मान्य नव्हते.
“सद्यस्थितीत कामांची गती अत्यंत निराशाजनक आहे. ती तातडीने सुधारावी. शिवाय जे काम पूर्ण झाले आहे, त्याचाही दर्जा समाधानकारक नाही. अनेक रस्त्यांवर खड्ड्यांचे जाळे झाले असून, लोक त्रस्त आहेत. त्यामुळे अशा रस्त्यांची डागडुजीही तात्काळ करावी,” असे निर्देश त्यांनी दिले.
भूसंपादन अधिकाऱ्यांनाही खडसावले
तुळजापूर तालुक्यातील एका रस्त्याच्या कामासंदर्भात विचारणा झाली असता, उपस्थित अभियंत्यांनी भूसंपादनाच्या अडचणी सांगितल्या. “सहा-सहा पत्र पाठवूनही संबंधित विभागाकडून कोणतीही कार्यवाही होत नाही,” अशी तक्रार त्यांनी केली.
यावर खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी भूसंपादन अधिकाऱ्यांना थेट जाब विचारला आणि ठणकावून सांगितले –
“सहा पत्र पाठवूनही आपण कार्यवाही करत नाही, याचा अर्थ कारभार ढिसाळ आहे. हा प्रश्न तातडीने सोडवा,” असा स्पष्ट आदेश त्यांनी दिला.
बैठकीला आमदार गायब
दिशा समितीच्या या महत्त्वाच्या बैठकीस सर्व आमदारांना आमंत्रित करण्यात आले होते. मात्र, आमदार कैलास पाटील आणि आमदार प्रवीण स्वामी यांच्याव्यतिरिक्त एकही आमदार उपस्थित नसल्याचे पाहायला मिळाले.
