पंढरपूर – उजनी धरणातून सोडण्यात आलेला सव्वा लाखाचा विसर्ग कमी करून ३० हजार करण्यात आला आहे. वीरचा विसर्ग कमी करून २५०० क्युसेक करण्यात आला आहे. त्यामुळे (चंद्रभागा) नदीची पाणी पातळी कमी होऊ लागली आहे. मात्र, पंढरपूर मंगळवारी १ लाख १० हजारांचा विसर्ग वाहत असल्याने पूरपरस्थिती कायम होती. व्यासनारायण झोपडपट्टीत पाणी शिरल्यामुळे चार कुटुंबांना स्थलांतरित करण्यात आले आहे. आता हळूहळू विसर्ग कमी करण्यात आल्याने पाणी ओसरू लागले आहे. पंढरपूर येथे मंगळवारी रात्री ८० हजार क्युसेक विसर्गाने नदी वाहत असल्याने गेल्या चार दिवसांपासून पाण्याखाली असलेले बंधारे, पूल बुधवारी सकाळपर्यंत खुले होतील. त्यावरील वाहतूक पूर्वपदावर येणार आहे. चंद्रभागा नदी मंगळवारी सकाळी धोक्याच्या पातळीवरून वाहत होती. यामुळे चंद्रभागेचा पंढरपूर येथील पुराचा धोका वाढला होता. यामुळे नदीकाठच्या व्यास नारायण झोपडपट्टीतील नागरिकांचे स्थलांतर करण्याच्या हालचाली प्रशासनाने सुरू केल्या होत्या. मात्र, उजनी व वीर धरण लाभक्षेत्रात पावसाचे प्रमाण कमी झाले आहे. त्यामुळे धरणात येणारी आवक कमी झाली आहे. परिणामी धरणातून करण्यात येणारा विसर्ग कमी करण्यात यश आले आहे. त्याचबरोबर पंढरपूर तालुक्यातही पावसाची दोन दिवसांपासून उघडीप घेतली आहे. परंतु, ओढे, नाल्याचे पाणी नदीत मिसळत आहे.
वाळवंटातील मंदिरे पुराच्या पाण्यात..
पंढरपूर येथील संभाव्य पुराचा धोका टळला आहे. पंढरपूर येथे भीमा (चंद्रभागा) इशारा पातळीवरून वाहत आहे. चंद्रभागा वाळवंटातील भक्त पुंडलिक मंदिरासह इतर मंदिरांना पुराच्या पाण्यात अर्धी बुडाली आहेत. महाद्वार घाटाच्या अर्ध्या पायऱ्यांवर पाणी आहे. मंदिरांना पाण्याचा वेढा कायम आहे. तर ८ बंधारेही पाण्याखाली आहेत. तेथील वाहतूक गेली दोन आठवड्यांपासून बंदच आहे. नदीकाठच्या गावांमध्ये प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
गोपाळपूर पुलाला पाण्याने केला स्पर्श मंगळवारी सकाळी पंढरपूर येथे १ लाख १० हजार क्युसेकचा विसर्ग सुरू होता. त्यामुळे पुराचे पाणी गोपाळपूर येथील जुन्या पुलावर येण्याची भीती निर्माण झाली होती. मात्र, दुपारनंतर पाणी कमी झाल्याने पुलाला पाण्याने केवळ स्पर्श केला आहे.
