पंढरपूर – कार्तिकी शुद्ध एकादशी रविवार, दि. ०२ नोव्हेंबर रोजी असून, यात्रा कालावधी दि. २२ ऑक्टोबर ते ५ नोव्हेंबर असा राहणार आहे. दि. २६ ऑक्टोबरपासून २४ तास दर्शन उपलब्ध करण्यात येणार आहे. श्री विठ्ठल- रुक्मिणी मातेच्या दर्शनासाठी येणाऱ्या वारकरी, भाविकांना मंदिर समितीकडून आवश्यक सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी दिली. कार्तिकी यात्रा पूर्वनियोजनाबाबत मंदिर समितीची बैठक श्री विठ्ठल-रुक्मिणी भक्तनिवास येथे संपन्न झाली. बैठकीस सदस्या शकुंतला नडगिरे, डॉ. दिनेशकुमार कदम, संभाजी शिंदे, ह.भ.प. ज्ञानेश्वर देशमुख (जळगावकर), अॅड. माधवी निगडे, ह.भ.प. प्रकाश जवंजाळ, ह.भ.प. शिवाजीराव मोरे, कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके, प्रभारी व्यवस्थापक पृथ्वीराज राऊत तसेच पुरातत्व विभागाचे डॉ. विलास वाहणे, कार्यकारी अभियंता श्रीनिवास गुजरे, वास्तुविशारद तेजस्विनी आफळे, जतन संवर्धन कामाचे ठेकेदार तसेच सर्व खातेप्रमुख उपस्थित होते.
कम्युनिटी रेडिओ केंद्रासाठी चार कोटी निधीचा प्रस्ताव
या बैठकीत श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर, परिवार देवता मंदिराचे जतन-संवर्धन कामाच्या अनुषंगाने विभागीय आयुक्त, पुणे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित करणे, प्रस्तावित पंढरपूर विकास आराखड्यामध्ये मुखदर्शनरांग, प्रशासकीय कार्यालय, अन्नछत्र व इतर अनुषंगिक सोयी-सुविधा उपलब्ध करून देणेबाबत जिल्हाधिकारी यांना प्रस्ताव देणे, कम्युनिटी रेडिओ केंद्र स्थापन करण्यासाठी चार कोटी रुपये इतका निधी उपलब्ध करून देणेबाबत शासनास प्रस्ताव देणे, एमटीडीसी भक्तनिवासाचा करारनामा वाढवून घेण्याबाबत शासनास प्रस्ताव देणे इत्यादी निर्णय घेण्यात आले.
सुलभ दर्शनासाठी भक्तांची विशेष सोय
या यात्रा कालावधीत वारकरी भाविकांना श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेचे सुरळीत व सुलभ दर्शन व्हावे. यासाठी दि. २६ ऑक्टोबरपासून २४ तास दर्शन उपलब्ध करण्यात येणार आहे. रविवार, दि २ नोव्हेंबर रोजी पहाटे २.२० वाजता राज्याचे उपमुख्यमंत्री व मानाचे वारकरी यांचे हस्ते सपत्नीक ‘श्रीं’ची शासकीय महापूजा संपन्न होणार आहे.
कार्तिकी एकादशीला राज्याचे उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते श्रींची शासकीय महापूजा करण्याची प्रथा आहे. परंतु, राज्याच्या मंत्रिमंडळात सध्या दोन उपमुख्यमंत्री असल्याने कोणत्या मान्यवरांच्या हस्ते पूजा करावी याबाबत शासनाकडून मार्गदर्शन मागविणार आहे.
राजेंद्र शेळके, कार्यकारी अधिकारी, मंदिर समिती
