सोलापूर – पंढरपूर विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीपुढे एक मोठा पेच निर्माण झाला आहे. कार्तिक एकादशीला पूजेचा मान कुणाला द्यायचा? यावरुन मंदिर समिती धर्मसंकटात सापडली आहे. त्यामागील कारणही अगदी तसंच आहे. परंपरेनुसार, आषाढी एकादशीला पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणी मंदिराचा पूजेचा मान हा राज्याच्या मुख्यमंत्र्यांना दिला जातो. त्यानुसार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आषाढी एकादशीला पूजा केली होती. तसेच राज्याला उपमुख्यमंत्री असतील तर परंपरेनुसार कार्तिकी एकादशीला पूजेचा मान हा उपमुख्यमंत्र्यांना दिला जातो. राज्यात सध्या उपमुख्यमंत्री आहेत. त्यामुळे कार्तिकी एकादशीला पूजेचा मान नेमका कुणाला द्यायचा? अशा संभ्रमात मंदिर समिती पडली आहे. हा पेड सोडवण्यासाठी आता महत्त्वाच्या घडामोडी घडल्याची माहिती आहे.
मंदिर समितीची आज महत्त्वाची बैठक पार पडली. कार्तिकी एकादशीला पूजेचा मान कोणत्या उपमुख्यमंत्र्यांना द्यायचा? याबाबत आजच्या बैठकीत चर्चा झाली. यावर तोडगा काढण्यासाठी आता मंदिर समिती राज्याच्या विधी आणि न्याय विभागाकडे विचारणा करणार आहे. कार्तिकी एकादशी 1 नोव्हेंबरला आहे. यावेळी कुणाला पूजेचा मान मिळतो? ते पाहणं महत्त्वाचं आहे.
याआधीही अशी परिस्थिती उद्भवलेली
विशेष म्हणजे याआधीदेखील अशी परिस्थिती उद्भवली होती. उपमुख्यमंत्री अजित पवार गेल्यावेळी सरकारमध्ये सहभागी झाल्यानंतर राज्यात दोन उपमुख्यमंत्री होते. त्यावेळी एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री तर देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हे उपमुख्यमंत्री होते. त्यावेळेस देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पूजा पार पडली होती. त्यानंतर 2024 मध्ये विधानसभा निवडणुकांमुळे आचारसंहिता लागली होती. त्यामुळे दोघांपैकी एकाही उपमुख्यमंत्र्यांना पूजेचा मान मिळाला नव्हता. त्याऐवजी विभागीय आयुक्तांच्या हस्ते पूजा पार पडली होती.
यानंतर यावर्षी देखील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका असण्याची शक्यता आहे. त्यामुळे आचारसंहितेच्या काळात निवडणूक आयोगाची परवानगी घेऊन उपमुख्यमंत्री पूजा करु शकतात का? ते समजणार आहे. पण परवानगी मिळाली तर कोणत्या उपमुख्यमंत्र्यांना पूजेचा मान मिळतो? ते पाहणं देखील औत्सुक्याचं असणार आहे.
