नुकत्याच सादर केलेल्या शहर विकास आराखड्यामुळे तीनशेहून अधिक मालमत्ताधारक बाधित होणार आहेत, या मालमत्ताधारकांमध्ये विकास आराखड्यासंदर्भात अनेक प्रश्न निर्माण झाले होते. त्यांच्या शंका निरसन करण्याचे काम पंढरपूर क्रेडाईच्यावतीने करण्यात आले. नुकतीच क्रेडाईच्यावतीने नागरिकांसोबत एक बैठक घेऊन मार्गदर्शन करण्यात आले. या कार्यक्रमाचे आयोजन येथील हिंदुमहासभा व तिर्थक्षेत्र बचाव समितीच्या पुढाकाराने हिंदुमहासभा भवनात करण्यात आले होते.
पंढरपूर शहरात सध्या कॉरिडॉरची चर्चा सुरु असून यामुळे संभाव्य बाधित ६४० नागरिकांची झोप उडालेली आहे. त्यातच पंढरपूर नगरपालिकेने पंढरपूर शहर विकास आराखडा प्रसिद्ध केला आहे. त्यानुसार सुमारे ३५० पेक्षा अधिक मालमत्तांधारकांना बाधा पोहोचणार असल्याचे समोर येत आहे. बाधित नागरिक यासंदर्भात शंका घेऊन पालिकेत खेटे घालत आहेत, परंतु पालिकेच्या वतीने नागरिकांना कसलेही मार्गदर्शन, शंका निरसन करण्याचे सहकार्य झालेले नाही. त्यामुळे हिंदू महासभा आणि तीर्थक्षेत्र बचाव समितीच्यावतीने येथील क्रेडाईच्या पदाधिकाऱ्यांनी बाधित क्षेत्रांतील मालमत्ताधारकांना मागदर्शन व शंका निरसन करण्यासाठी आमंत्रित करण्यात आले होते.आराखड्यावर हरकती नोंदण्याबाबत सूचना देण्यात आल्या.
