पंढरपूर – मागील निवडणुकीत भालके गटाचे उमेदवार संतोष नेहतराव यांना १६,९२० तर साधना भोसले या २०,७५४ मते मिळवून विजयी झाल्या होत्या. त्याचबरोबर परिचारक गटाच्या पंढरपूर विकास आघाडीचे १६, भाजपचे ४, भालके गटाचे २, काँग्रेसचे ६, अपक्ष ७उमेदवार निवडून आले होते. मात्र, यंदाही जनतेतून नगराध्यक्ष आणि १८ प्रभागातून ३६ नगरसेवक निवडून दिले जाणार आहेत. सध्या शहराची दुरवस्था झाली असून, शहरात निवडणुकीसाठी चार आघाड्या होण्याची चिन्हे दिसत आहेत. मागील अनेक वर्षापासून पंढरपूर नगरपरिषदेवर परिचारक गटाच्या पंढरपूर-मंगळवेढा विकास आघाडीचे वर्चस्व आहे. सध्या शहरातील राजकीय परिस्थिती पाहता परिचारकांना शह देण्यासाठी आ. अभिजित पाटील, आ. राजू खरे, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अनिल सावंत, परिचारक गटातील व भालके गटाच्या विरोधातील नेत्यांना तसेच विविध सामाजिक संघटनांच्या अध्यक्षांना एकत्र घेऊन आघाडी करण्याच्या तयारीत आहेत.
१ ) सध्या नगराध्यक्ष पदासाठी भालके गटाच्या प्रणिता भालके, आ. पाटील गटाकडून साधना भोसले, दीपाली नेहतराव, स्मिता फत्तेपूरकर, परिचारक गटाकडून वैशाली वाळूजकर, शामल शिरसाठ, स्मिता अधटराव, वैष्णवी मलपे, स्वाती धोत्रे हे इच्छुक उमेदवार आहेत.
२ ) मागील निवडणुकीत भोसले यांनी परिचारक गटाकडून निवडणूक लढवली होती. मात्र, यंदा आ. अभिजित पाटील यांच्या संपर्कात आहेत. त्यांनी विधानसभा निवडणुकीत भालके यांना मदत केल्याची चर्चा आहे. यामुळे नगराध्यक्ष निवडणुकीत भोसले हे भालके मदत करतील, अशी अपेक्षा ठेवून आहेत. त्याचबरोबर विधानसभा निवडणूक काँग्रेसकडून लढवलेले भगीरथ भालके हे खा. प्रणिती शिंदे यांनी सरकोली दौरा केला होता, त्यावेळी तेथे दिसून आले नाहीत. यामुळे नगरपरिषदेच्या निवडणुकीला मनी पॉवर कसे दाखवणार? त्यावर पर्याय म्हणून भगीरथ भालके पक्षांतर करून स्वतंत्र आघाडी करून स्वतःचा गट जिवंत ठेवण्याचा प्रयत्न करणार, अशीही राजकीय वर्तुळात चर्चा रंगू लागली आहे.
3) दुसरीकडे आ. अभिजित पाटील यांनी नगर परिषदेच्या निवडणुकीसंदर्भात घेतलेल्या बैठकीला भालके गटातील नगरसेवक सुधीर धोत्रे, बालाजी मलपे, संजय बंदपट्टे यांच्यासह अनेक प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते. भालके-पाटलांची भेट नसली तरी मध्यस्थींमार्फत चर्चा सुरू आहेत. भैरवनाथ शुगर उद्योग समूहाचे अध्यक्ष अनिल सावंत यांनीदेखील पंढरपूर आघाडी उभारण्याच्या तयारीने प्रत्येक प्रभागातील संभाव्य उमेदवारांची यादी तयार केली आहे.
भाजपचे उमेदवार होते
विजयी स्मिता फत्तेपूरकर मागील पंचवार्षिक निवडणुकीत परिचारकांनी भाजपच्या चिन्हावर चार उमेदवार विजयी केले होते. सध्या भाजपचे आमदार समाधान आवताडे आहेत. मात्र, मागील साडेचार वर्षांपासून सतत अवताडेंबरोबर राहणारे संतोष डोंगरे, सुनील डोंबे, नीलेश आंबरे, प्रसाद ऊर्फ भय्या कळसे, आप्पा राऊत आहेत. त्यांना भाजपची उमेदवारी देण्यासाठी आ. आवताडे यांचा प्रयत्न राहणार आहे.
‘ते’ तिसऱ्या आघाडीच्या तयारीत
प्रणिता भालके या नगराध्यक्ष पदासाठी इच्छुक आहेत. आ. पाटील व भालके यांची एकत्र लढण्याची तयारी झाली तर प्रणिता भालके यांना उमेदवारी मिळू शकते. याचा अंदाज माजी उपनगराध्यक्ष व नगराध्यक्ष नागेश भोसले यांना आला आहे. यामुळे ते स्वतंत्र आघाडी करण्याच्या तयारीत आहेत. इच्छुकांची चाचपणी सुरू आहे.
मंगळवेढ्यात समविचारी झाली तर..
मंगळवेढ्यात ज्याप्रमाणे भालके-परिचारक यांनी एकत्र येऊन समविचारी आघाडीच्या माध्यमातून साखर कारखान्यात सत्ता मिळवली, तोच प्रयोग परिचारक-भालके पंढरपुरात करतील का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तसे झाले तर आमदार समाधान आवताडे हे परिचारक विरोधी गटात दिसले तर नवल नको.
