मंगळवेढा – गेल्या दोन महिन्यांपासून सुरू असलेल्या सततच्या पावसामुळे आणि हवामानातील बदलामुळे सर्दी, ताप, खोकला, मलेरिया यांसारख्या आजारांचे रुग्ण वाढले आहेत. त्यातच आता डेंग्यूने डोके वर काढल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. रुग्ण राज्यातील अनेक भागांमध्ये डेंग्यूचे असताना, आढळत मंगळवेढ्यातील आरोग्य यंत्रणेकडून प्रतिबंधात्मक उपाययोजना होत नसल्याची तक्रार नागरिकांमधून होत आहे. रस्त्याच्या कडेला पाणी साचलेले, गटारांची दुर्दशा, धूरफवारणीचा अभाव आणि पावडर टाकण्याची कोणतीही हालचाल नाही, यामुळेच डेंग्यूचा धोका वाढत असल्याचा नागरिकांचा आरोप आहे. आरोग्य विभागाकडून दरवर्षी डेंग्यू प्रतिबंधासाठी जनजागृती, साठलेले पाणी निकामी घराघरात जाऊन करणे, तसेच “कोरडा दिवस’ पाळण्याचे आवाहन करणे गरजेचे आहे. मात्र, कुठेतरी डेंग्यू रुग्ण आढळल्यावर तेवढ्यापुरती धावपळ केली जाते. आरोग्य विभागातीलच कर्मचाऱ्याला डेंग्यू झाल्याने विभागाच्या कार्यक्षमतेवरच प्रश्नचिन्ह निर्माणा झाले आहे. दरम्यान, ग्रामीण रुग्णालयाच्या परिसरातही पावसामुळे मोठ्या प्रमाणात गवत आणि पाणी साचल्याने मच्छरांची वाढ होत असल्याचे चित्र दिसत आहे.
