अवघ्या महाराष्ट्रामध्ये दिवाळी संपताच आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे नगारे वाजू लागले आहेत. यामधून पंढरपूर शहर आणि तालुक्यातही गतिमान हालचाली सुरू झालेले आहेत. अवघ्या का ही दिवसांवर येऊन ठेपलेल्या या निवडणुकीची तयारी विविध पद्धतीने केली जात असतानाच, कोणी काहीही बोलत असले तरी या निवडणुकीतही पंढरपूर तालुक्यातील विठ्ठल परिवार विरुद्ध पांडुरंग परिवार हीच परंपरा या निवडणुकीतही दिसून येणार आहे. पंढरपूर तालुक्यातील राजकीय इतिहास पाहिला असता, कोणत्याही निवडणुकीत विठ्ठल परिवार विरुद्ध पांडुरंग परिवार हीच लढत पहावयास मिळाली आहे. पांडुरंग परिवाराचे नेतृत्व हे परिचारक घराण्याकडे असते तर विठ्ठल परिवाराचे नेतृत्व हे श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन यांच्याकडे असते. हीच आजवरच्या विविध निवडणुकीतील परंपरा चालत आलेली आहे. या परंपरेनुसारच पंढरपूर शहर आणि तालुक्यातील कार्यकर्ते ही विभागले गेलेले आहेत. विठ्ठलचे संस्थापक कर्मवीर औदुंबर अण्णा पाटील आणि कर्मयोगी सुधाकरपंत परिचारक यांच्यामध्ये कायम राजकीय विरोध पहावयास मिळाला होता. त्यांच्या राजकीय कालावधीत अनेक निवडणुका पार पडल्या होत्या. कालांतराने विठ्ठल सहकारी साखर कारखान्यावर स-हकार शिरोमणी वसंतदादा काळे यांच्या नेतृत्वाखाली संचालक मंडळ स्थापन झाले होते. त्यामुळे परिचारक विरोधी गटाचे विठ्ठल परिवाराचे नेतृत्व पर्यायानेच वसंतदादा काळे यांनी स्वीकारले होते. दरम्यानचे कालावधीत अनेक निवडणुका पार पडल्या होत्या. वसंतदादा काळे यांच्या निधनानंतर विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमन पदाची धुरा स्व.आ भारतनाना भालके यांच्याकडे आली होती. भालके यांच्या कालावधीत तर परिचारकांच्या विरोधात कडवे आव्हान दिले होते. अनेक संस्थांवर विजय मिळवण्यात आ.भालके यांना यश मिळाले होते. त्यामुळे विठ्ठल परिवार आणि पांडुरंग परिवार यांच्यातील राजकारण तीव्र झाले होते. भारत भालके यांच्यानंतर याच विठ्ठल कारखान्यावर आ. अभिजीत पाटील यांची सत्ता आहे. आजही हेच चेअरमन असलेले आ. अभिजीत पाटील परिचारक यांना शह देण्याचा सातत्याने प्रयत्न करत आहेत. अशातच या आलेल्या आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या म्हणजे पंढरपूर नगरपालिका आणि पंढरपूर तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका या आता सुरू झाल्या आहेत. यामध्ये विविध प्रकारच्या बैठका सुरू आहेत.
नगराध्यक्ष पद ही पक्षश्रेष्ठींच्या मनावर
नगराध्यक्ष पद हे सर्वसाधारण महिला यासाठी आहे. त्यामुळे दोन्ही बाजूंनी अनेकजन इच्छुक आहेत. या पदासाठी कोण कुठ जाईल याचा अंदाज येत आहे. मात्र याकडे विठ्ठल परिवारातील कार्यकर्ते फारसे लक्ष देणार नाहीत. भले कुणालाही कोणाकडूनही उमेदवारी मिळेल. यामधून मात्र पांडुरंग परिवाराचे नेतृत्व माजी आमदार प्रशांतराव परिचारक करतील आणि विठ्ठल परिवाराचे नेतृत्व है विठ्ठलचे चेअरमन म्हणून आ अभिजीत पाटील लंच करतील हे मात्र नक्की आहे.
