सोलापूर – पंढरपूरच्या एकादशीनिमित्त कार्तिकी वारकरी भाविकांसाठी मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागीय कार्यालय प्रशासनाने सोलापूर विभागातून ३६ विशेष फेऱ्या करण्याचा निर्णय घेतला आहे. पंढरपूरच्या विठ्ठलाच्या दर्शनासाठी राज्यातून येणाऱ्या वारकऱ्यांच्या संख्येचा विचार करून रेल्वे प्रशासनाने सोलापूर मिरज व मिरज-लातूर या मार्गावरून विशेष गाड्या चालवण्याचे घोषित केले आहे. गुरुवार, ३० ऑक्टोबर ते ४ नोव्हेंबर या काळात रेल्वेच्या ३६ विशेष फेऱ्या चालवल्या जाणार आहेत. गाडी क्रमांक ०१४४३ मिरज-लातूर ३० ऑक्टोबर ते ४ नोव्हेंबरपर्यंत दररोज सकाळी ७:०० वाजता मिरजहून सुटून ती दुपारी ३:३० वाजता लातूरला पोहोचणार आहे. ती गाडी सकाळी १०:१५ वाजता पंढरपूरच्या रेल्वेस्थानकावर येईल. गाडी क्रमांक ०१४४४ ही लातूर-मिरज दररोज दुपारी ४:०० वाजता लातूरहून सुटून याच दिवशी रात्री ११:४५ वाजता मिरजला पोहोचणार आहे. या गाडीचे सक ाळी ७:४५ वाजता पंढरपूरच्या स्टेशनवर आगमन होईल. गाडी क्रमांक ०१४४२ लातूर-मिरज ही दररोज सकाळी ६ वाजता लातूरच्या स्थानकावरून सुटून ती दुपारी १:५० वाजता मिरजला पोहोचेल. गाडी क्रमांक ०१४४१ मिरज-लातूर दररोज रात्री १०:०० वाजता मिरजच्या स्थानकावरून सुटेल व ती दुसऱ्या दिवशी पहाटे ५:३० वाजता लातूरच्या स्थानकावर पोहोचेल. तीच गाडी पुन्हा रात्री ११:५० वाजता पंढरपूरला पोहोचेल. विशेष गाड्यांना कवठेमहांकाळ, ढालगाव, जत रोड, म्हसोबा डोंगरगाव, सांगोला, पंढरपूर, मोडनिंब, कुडूवाडी, शेंद्री, बार्शी टाऊन, पांगरी, धाराशिव, येडशी, कळंब रोड, ढोकी, मुरुड, औसा रोड आणि हरंगुळ, अरण, सलगर आदी स्थानकावर थांबे आहेत.
कार्तिकी यात्रेनिमित्त वारकऱ्यांसाठी
रेल्वे प्रशासनाने वाढीव ३६ गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे. वारकऱ्यांच्या सोयीनुसार गाड्यांच्या संख्येत आणखी वाढ होण्याची शक्यताही आहे, अशी माहिती मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागाचे वरिष्ठ वाणिज्य प्रबंधक योगेश पाटील यांनी दिली.
