पंढरपूर – कार्तिकी यात्रेत होणारी गर्दी लक्षात घेऊन ८ लाख बुंदी लाडू प्रसादाची निर्मिती करण्यात येत असल्याची माहिती मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी गुरुवारी ‘लोकमत’शी बोलताना दिली. श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या बुंदी लाडू प्रसादाला भाविकांतून मोठी मागणी होते. प्रत्येक भाविकाला लाडू प्रसाद मिळेल, यादृष्टीने ८ लाख बुंदी लाडू प्रसाद व एक लाख राजगिरा लाडू प्रसाद तयार करण्यात येत आहे. यामध्ये बुंदी लाडू प्रसाद मंदिर समितीमार्फत व राजगिरा लाडू प्रसाद आऊटसोर्सिंग पद्धतीने खरेदी करण्यात येत आहे. ७० ग्रॅम वजनाचे दोन बुंदी लाडू कागदी पिशवीत पॅकिंग करून प्रति पाकीट २० रुपयेप्रमाणे व २५ ग्रॅम वजनाचे दोन राजगिरा लाडू पॅकिंग करून प्रति पाकीट १० रुपयेप्रमाणे भाविकांना उपलब्ध करून देण्यात येत आहेत. ७० ग्रॅम वजनाचे दोन बुंदी लाडू प्रसाद म्हणून मिळणार लाडू बनवण्यासाठी स्वयंसेवक ४०, ठेकेदारांचे २७, सेवक कर्मचारी २२, रोजंदारीवरील १८ एकूण १००-११० मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यात आले आहे. २४ तास हे काम सुरू आहे. व्यवस्थेची जबाबदारी भीमाशंकर सारवाडकर पाहत आहेत.
या साहित्याचा वापर
कार्तिक यात्रेनिमित्त १५० क्विंटल पोत्याचे ८ लाख बुंदी लाडू तयार करण्याचे नियोजन आखले आहे. यासाठी हरभरा डाळ १५० क्विंटल, साखर ४५० क्विंटल, शेंगदाणे तेल डबे ७५०, काजू १५० किलो, बेदाणे ४५० किलो, लेमन रंग १५ किलो, वेलची ७५ किलो वापरण्यात येत आहे. लाडू प्रसादाची शासकीय प्रयोगशाळेतून खाण्यास योग्य असल्याबाबत तपासणी करून घेण्यात आली असल्याचे मंदिर समितीचे व्यवस्थापक राजाभाऊ राऊत यांनी सांगितले.
