पंढरपूर – कार्तिकी वारी निर्विघ्नपणे पार पडण्यासाठी पोलीस यंत्रणा सज्ज आहे. तब्बल ३ हजार ५७ पोलीस अधिकारी व कर्मचारी यांची नेमणूक केल्याची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत डगळे यांनी दिली. वारकरी तसेच स्थानिक नागरिकांच्या सुरक्षा तसेच अतिक्रमण मोहिमेला प्राधान्य दिले आहे. एक पोलीस अधिक्षक, एक अप्पर पोलीस अधिक्षक, १२ पोलीस उपअधिक्षक, २० पोलीस निरिक्षक, १२७सहाय्यक पोलीस निरिक्षक व पोलीस उपनिरिक्षक, १ हजार ३८६ पोलीस अंमलदार व १ हजार ५०० होमगार्ड तसेच २ एसआरपीएफ कंपनी, ४ वी डीएस पथके, आरसीपी दोन पथके, क्युआरटी दोन पथके, आपत्कालिन परिस्थिती हाताळण्यासाठी प्रशिक्षित १० कार्ट पथके नियुक्त केली आहेत. जलप्रवासी वाहतुकीवर नियंत्रणासाठी जलसंपदा विभाग व पोलीस प्रशासनाच्या वतीने ८ ठिकाणी पथके स्थापन करण्यात आली आहेत. गर्दीवर नियंत्रणासाठी नदीपात्र, ६५ एकर, महाव्दार, महाव्दार घाट, पत्राशेड आदी ठिकाणी १२ वॉच टॉवर उभारले आहेत. भाविकांचे संरक्षण तसेच चोरी रोखण्यासाठी माऊली स्कॉडची स्थापन केली असून यामध्ये वारकरी व नागरिकांच्या वेशात पोलीस अधिकारी तैनात केले आहेत, तसेच वारकरी भाविकांना रहदारीचा अडथळा येऊ नये यासाठी ५ अतिक्रमण पथके नेमली आहेत. चारकऱ्यांच्या मदतीसाठी सावरकर चौक, शिवाजी चौक, चंद्रभागा वाळवंट तसेच अंबाबाई पटांगण आदी ७ ठिकाणी तीर्थक्षेत्र पोलीस मदत केंद्रे सुरु केली आहेत. भाविकांना सूचना देण्यासाठी ध्वनीक्षेपन यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली. जड वाहतुक शहराबाहेरुन वळवली आहे. वाहतुक नियमनासाठी शहराबाहेर १२ तर शहरांतर्गत १० ठिकाणी डायव्हरशन पॉइंट सुरु केले आहे. खाजगी वाहनांना थांबण्यासाठी शहरात व शहराबाहेर १६ ठिकाणी वाहनतळ व्यवस्था केली आहे. सुमारे १० ते ११ हजार वाहनांची पाकींग व्यवस्था होणार आहे. भाविकांनी पोलीस प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करण्याचे आवाहन डगळे यांनी केले आहे.
