सोलापूर- सध्या महाराष्ट्रात आगामी स्थानिक स्वराज्य संस्था, महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमिवर राजकीय जगतात मोठमोठे उलटफेर पाहायला मिळत आहेत. प्रचंड ताकदीचे विविध नेते पक्षांतर करत आहेत. तर सत्ताधारी गटामध्ये जोरदार प्रवेश होत आहेत. राज्यात या निवडणुकांमध्ये महायुती व महाविकास आघाडी एकत्र लढणार की नाही हे येणाऱ्या काळातच स्पष्ट होणार आहे. सध्यातरी अनेक ठिकाणी आघाड्यांमध्ये बिघाड होणाऱ्या घटना समोर येत आहेत.सध्या सोलापूरमधूनही अशीच एक घडामोड समोर येत आहे. यामध्ये सोलापूर महाविकास आघाडीच वादाचे चित्र समोर आले आहे. ठाकरेंची शिवसेना आणि काँग्रेसमध्ये मोठे मतभेद झाल्याचे उघड झाले आहे. ठाकरेंच्या शिवसेनेचे उपनेते शरद कोळी यांनी सोलापूरच्या काँग्रेस खासदार प्रणिती शिंदे यांच्यावर जोरदार टीका केली आहे. त्यांनी कोण प्रणिती शिंदे? त्या आमच्यासाठी चिल्लर आहेत, अशा जहरी शब्दांमध्ये टीका केली आहे. त्यामुळे सध्या या वादाची सोलापूरमध्ये जोरदार चर्चा आहे.
शरद कोळी नेमकं काय म्हणाले आहेत?
“विधानसभेला आमच्याबरोबर गद्दारी करणाऱ्या प्रणिती शिंदे यांच्याबरोबर आम्ही युती करणार नाही. आघाडी तुटली तरी काही समस्या नाही, पण प्रणिती शिंदे यांचं नेतृत्व आम्हाला मान्य नाही”, असं शरद कोळी म्हणाले आहेत.
