वेळापूर – सरकारी दवाखान्यात कापूस आणण्यासाठी निघालेल्या अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी दोषी ठरलेल्या तिघांना जन्मठेपेची शिक्षा माळशिरस येथील विशेष सत्र न्यायाधीश आर.व्ही. ताम्हाणेकर यांनी ठोठावली आहे. याबाबत पीडित मुलीच्या आईने वेळापूर पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली होती. त्यामध्ये फिर्यादीचा फिरून साड्या विक्रीचा व्यवसाय असल्याने ती दि. ३० ऑक्टोबर २०२१ रोजी पंढरपूर येथे गेलेली होती. त्या दिवशी दुपारी ३ च्या सुमारास पीडिता गावातील सरकारी दवाखान्यामध्ये कापूस आणण्यास जात असताना गावातील युवराज गोडसे, रणजित कोळेकर व एक अनोळखी असे तिघे जण सरकारी दवाखान्याजवळ उभे होते. पीडिता जात असताना युवराज गोडसे याने तिला रस्त्यात अडवून अचानक हातास धरून दवाखान्याच्या बाजूस चालू असलेल्या बांधकामामध्ये ओढत नेले. त्या ठिकाणी तिच्यावर अत्याचार केला व घरी सांगशील तर मारून टाकीन, अशी धमकी देत निघून गेल्याचे म्हटले आहे. त्यावेळी अकलूजचे तत्कालीन उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. बसवराज शिवपुजे यांनी तपास करून दोषारोप दाखल केले होते. माळशिरस येथील विशेष सत्र न्यायालय आर. व्ही. ताम्हाणेकर यांच्यासमोर या खटल्याची सुनावणी झाली. त्यासाठी पीडिता, तिची आई फिर्यादी, ओळख परेड घेणारे तहसीलदार तुषार देशमुख, डॉ. बापू ओहाळ, डॉ. झाहीद इनामदार, डॉ. अमित पेंदोर अशा १३ जणांच्या साक्षी महत्त्वाच्या ठरल्या. यामध्ये न्यायालयाने तिन्ही आरोपींना दोषी धरून विविध कलमांखाली प्रत्येकी सश्रम २० वर्षांची तसेच दंडाची शिक्षा सुनावली आहे. यामध्ये सरकारी वकील म्हणून एस. ए. ढवळे, संग्राम पाटील व एस.टी. मेंढेगिरी यांनी काम पाहिले.
