पंढरपूर भोळ्या भाविकाने मोठ्या श्रद्धेने श्री विठ्ठल, रुक्मिणी मातेच्या चरणी वाहिलेले फुलांचे हार आणि वाहिलेले बुक्का, उदबत्ती अशा प्रासादिक वस्तू आणि निर्माल्य निष्ठूर मंदिर समिती प्रशासनाकडून थेट कचरा डेपोत नेऊन टाकले जात असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे सर्वसामान्य भाविकांतून तीव्र संताप व्यक्त होत आहे. दरम्यान महर्षी वाल्मीक संघाने मंदिर समितीच्या या भावनाशून्य कारभाराचा निषेध करीत हा प्रकार थांबवावा, अन्यथा आंदोलन छेडले जाईल, असा इशारा दिला आहे. श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या दर्शनासाठी दररोज किमान ४० ते ५० हजार भाविक पंढरीत येतात. मोठ्या श्रद्धेने श्री विठ्ठल आणि रुक्मिणीस तुळशी आणि इतर फुलांचे हार, बुक्का, अगरबत्ती, पेढे, बत्ताशे, साखर फुटाणे अशा प्रासादिक वस्तू विठ्ठल चरणी अर्पण करतात. त्यापैकी पेढे वेगळे काढले जातात आणि इतर प्रासादिक वस्तू निर्माल्य म्हणून मंदिरातून बाहेर काढले जाते. देवाच्या चरणी वाहिल्याने पवित्र झालेले हे निर्माल्य त्याची सुयोग्य रीतीने व्यवस्था करणे अपेक्षित असताना श्रद्धेचा अभाव असलेल्या, निष्ठूर महसूल प्रशासनाकडून मात्र ही निर्माल्य थेट नगरपालिकेच्या कचरा डेपोत नेऊन टाकून दिले जाते. याच ठिकाणी शहरातील सुका कचरा, हॉटेलमधील शिल्लक खाद्य पदार्थ, मांसाहारी पदार्थ आणून टाकलेले असतात. डुकरे, कुत्री, गाढवे अशी भटकी जनावरे यांचा उच्छाद असतो. अशा ठिकाणी देवाच्या चरणी श्रध्देने वाहिलेल्या प्रासादिक वस्तू टाकून दिल्या जात असल्याचे समोर आले आहे. निर्माल्यापासून अगरबत्ती निर्मितीची केली मागणी महर्षी वाल्मीक संघाचे अध्यक्ष गणेश अंकुशराव यांनी हा प्रकार उजेडात आणताना मंदिर समितीच्या या निष्ठूर पणाचा निषेध केला आहे. तसेच हा प्रकार तातडीने बंद करावा, निर्माल्याचे अगरबत्ती, धूप असे उपपदार्थ बनवले जावेत, अशी मागणी केली आहे. मंदिर समितीला उशिरा शहाणपण भाविकांच्या गळ्यात पुष्पहार गुरुवारी मंदिर समितीचा हा घृणास्पद प्रकार उघडकीस येताच खडबडून जाग आलेल्या मंदिर समिती प्रशासनाने दुपारनंतर विठ्ठलाच्या चरणी अर्पण झालेले पुष्पहार भाविकांच्या गळ्यात परत घालण्यास सुरुवात केली आहे. तसेच या निर्माल्यापासून अगरबत्ती बनवल्या जाणार असल्याचे अगरबत्ती पुड्याचे डिझाइन प्रसिद्धीस देऊन सांगितले आहे.
