जपानला टाकले मागे, नीती आयोगाने दिली माहिती
भारताची आर्थिक स्थिती सुधारत असल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत असून, आता बलाढ्य जपानला मागे टाकत भारत जगातील चौथी मोठी अर्थव्यवस्था बनला आहे. भारताच्या पुढे आता केवळ अमेरिका, चीन आणि जर्मनी हे तीन देश आहेत. नीती आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी वी. व्ही. आर. सुब्रम्हण्यम यांनी याबाबतची माहिती दिली.नीती आयोगाच्या दहाव्या गव्हर्निंग कौन्सिलच्या बैठकीनंतर सुब्रम्हण्यम यांनी ही माहिती दिली. अनेक संकटांवर मात करत भारतीय अर्थव्यवस्थेने जगातील चौथ्या क्रमांकावर झेंडा रोवला. आता जगातील तिसऱ्या सर्वांत मोठ्या अर्थव्यवस्थेकडे भारताची आगेकूच सुरू आहे, असेही निती आयोगाने म्हटले आहे. देशाची आर्थिक स्थिती मजबूत आहे. आता आपली अर्थव्यवस्था ४ ट्रिलियन डॉलर इतकी झाली आहे, असेही सुब्रम्हण्यम म्हणाले.
सुब्रमण्यम यांनी जागतिक नाणेनिधीच्या आकड्यांचा आधार घेत चौथ्या अर्थव्यवस्थेचा मौलाचा दगड रोवल्याची माहिती दिली. आयएमएफनुसार भारताची अर्थव्यवस्था जपानपेक्षा मोठी झाली आहे. आता अमेरिका, चीन आणि जर्मनी हे भारताच्या पुढे आहेत. जर भारत नियोजनाप्रमाणे घोडदौड करत राहिला तर येत्या २.५ ते ३ वर्षांत जर्मनीला मागे टाकत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनू शकतो, असा दावाही सुब्रम्हण्यम यांनी केला.
भारताची अर्थव्यवस्था आता ४ ट्रिलियन डॉलर एवढी झाली आहे. त्यामुळे भारताने आता जपानला मागे टाकत जगात चौथे स्थान पटकावले आहे. विकासाची गती अशीच वेगवान राहिल्यास आगामी काळात भारत जगातील तिसरी मोठी अर्थव्यवस्था बनू शकते, असा दावाही नीती आयोगाने केला आहे. ४ ट्रिलियन डॉलर्स म्हणजे भारतीय रुपयांत ३४० लाख कोटी रुपये एवढी मोठी अर्थव्यवस्था ठरली आहे.
