कुठे बोलत होते अजित पवार?
बालाजीनगरमधील एक रस्ता स्थानिक माजी नगरसेवक आप्पा रेणुसे यांनी दत्तक घेऊन त्याची दुरूस्ती तसंच शुभोभिकरण केलं असून पुणे मनपाच्या या रस्ता दत्तक योजनेचं उपमुख्यमंञी अजित पवार यांच्या हस्ते लोकार्पण झालं. या कार्यक्रमानंतर ते प्रसारमाध्यमांशी बोलत असताना त्यांना 42 कोटींच्या स्टँम्प ड्युटीसंदर्भात प्रश्न विचारण्यात आला.
बानकुळे काय म्हणाले?
अजित पवारांना 42 कोटींच्या स्टँम्प ड्युटीसंदर्भात प्रश्न विचारताना बावनकुळेंनी केलेल्या विधानाचा संदर्भही पत्रकारांनी दिला. मुद्रांक शुल्क विभागानं पार्थ पवारांची अमेडिया कंपनी आणि शीतल तेजवानी यांना 42 कोटी भरण्याची नोटीस बजावलीय. बावनकुळेंना मात्र ही नोटीस मान्य नाही. व्यवहार रद्द करण्यासाठी 42 कोटींची गरज नसल्याचं म्हटलं आहे. बावनकुळेंच्या याच विधानाचा संदर्भ देत अजित पवारांना प्रश्न करण्यात आला.
अजित पवारांनी काय उत्तर दिलं?
42 कोटींची स्टँम्प ड्युटी कोण भरणार? असा प्रश्न अजित पवारांना विचारताना बावनकुळेंनी केलेल्या ’42 कोटींचा दंड भरण्याची गरज नाही’ या विधानाचा संदर्भ देण्यात आला. हा प्रश्न ऐकताच अजित पवारांनी, “अरे बाबा या व्यवहाराची सखोल चौकशी करण्यासाठी शासनाची समिती नियुक्त केली आहे. त्याचा अहवाल येऊ द्या, मग शासन ठरवेल याबाबत काय निर्णय घ्यायचा,” असं उत्तर पत्रकारांना दिलं. एका महिन्यामध्ये या प्रकरणाशी संबंधित अहवाल सादर करण्याचे आदेश सरकारने यापूर्वीच स्थापन केलेल्या समितीला दिले आहेत.
राजीनाम्याच्या मागणीवर काय म्हणाले अजित पवार?
अंजली दमानिया यांनी अजित पवारांनी राजीनामा द्यावा अशी मागणी केल्याचा उल्लेख करत प्रश्न विचारण्यात आला असता उपमुख्यमंत्र्यांनी, “हे बघा कोणी काहीही मागणी करू देत. तो त्यांचा प्रश्न हे, पण माझ्या सद्सद् विवेकबुद्धीला जे पटेल तेच मी करेन,” असं उत्तर दिलं.
